आर्थिक चणचणीमुळे घरभाडं आणि वीजबिल भरता येत नसल्याने दोन राष्ट्रीय खेळाडूंनी वाममार्गाला लागत एका व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्कर्ष आणि श्रेयांश सिंह अशी या दोन खेळाडूंची नावं असून, ते कानपूर विद्यापीटामधून डिप्लोमा करत आहेत. यापैकी उत्कर्ष हा हॉकीपटू तर श्रेयांश सिंह हा हँडबॉसमधील राष्ट्रीय खेळाडू आहे. या दोघांसह दिनेश यादव आणि अन्य एकाने मिळून दिल्लीहून येत असलेल्या एका व्यापाऱ्यााला लुटले. दरम्यान, पोलिसांनी य चौघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ११ जुलै रोजी व्यापारी संकेत त्रिपाठी हे दिल्लीहून आपलं सामान घेऊन रावतपूर स्टेशनवर पोहोचले. येथे बाहेर त्यांना एक गाडी दिसली. त्यामध्ये तीन जण बसलेले होते. तर एक जण बाहेर उभा होता. त्यांनी आम्ही शिवली येथे जात आहोत. तुम्हाला यायचं असेल तर या, असे व्यापाऱ्याला सांगितले. त्यांच्यावर विश्वास बसल्याने सदर व्यापारी त्यांच्या गाडीमध्ये बसला.
दरम्यान, ही गाडी जेव्हा कल्याणपूरच्या निर्मनुष्य रस्त्यावर पोहोचली तेव्हा येथे कारमधील चौघांनी मिळून व्यापाऱ्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडील पैसे, आणि सामान लुटले. त्यानंतर त्याला कारमधून तिथेच ढकलून पोबारा केला. एवढंच नाही तर आरोपींनी सदर व्यापाऱ्याच्या मोबाईलमधून १५ हजार रुपये आपल्या खात्यामध्ये यूपीआयच्या माध्यमातून जमा करून घेतले.
या प्रकरणी व्यापारी संकेत त्रिपाठी यांनी रावतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच रविवारी चारही आरोपींना अटक केली. यापैकी दिनेश यादव याच्यावर आधीही काही गुन्हे दाखल होते. अशी माहिती समोर आली आहे. तर घराचं भाडं आमि वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्याने आपण चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केलं आहे.