झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 08:30 IST2025-12-03T08:28:22+5:302025-12-03T08:30:24+5:30
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ चा आकडा असणे गरजेचे आहे.

झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
बिहारच्या निवडणुकीनंतर आता झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. हेमंत सोरेन आणि भाजपा यांच्या संभाव्य मैत्रीची चर्चा जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पत्नी कल्पना सोरेन अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यातच झारखंडच्या राज्यपालांची अमित शाहांसोबत भेट झाली त्यामुळे या राजकीय टायमिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोरेन यांनी भाजपाच्या वरिष्ठांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरू आहे.
हेमंत सोरेन स्वत: भाजपाच्या संपर्कात आहे असा दावा केला जातो परंतु जेएमएमने हे नाकारले आहे. झारखंडच्या राजकारणात लवकरच फेरबदल होतील अशी चिन्हे आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा सुपडा साफ झाला. या पराभवानंतर झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा पाया ढासळताना दिसत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाची राजद आणि काँग्रेससोबत फारसं जमत नाही. त्यामुळे भाजपासोबत मैत्रीचा नवा सिलसिला झारखंडमध्ये सुरू होऊ शकतो. त्यामुळे खरेच हेमंत सोरेन आणि भाजपा यांच्यात मैत्रीचा नवा अध्याय सुरू होईल का यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.
पडद्यामागे हालचाली
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ चा आकडा असणे गरजेचे आहे. सध्या आघाडीत जेएमएमकडे ३४, काँग्रेस १६, राजद ४ आणि डाव्या पक्षांकडे २ असे मिळून ५६ आमदारांचे पाठबळ आहे. जर जेएमएम आणि भाजपा यांचे नवीन समीकरण बनले तर हा आकडा थेट ५८ वर पोहचतो. जर जेएमएम ३४, भाजपा २१, एलजेपीआर १, एजेएसयू १, जेडीयू १ एकत्र आले तर ५८ आमदार होतात. जे बहुमतापेक्षा आणि इंडिया आघाडीच्या संख्याबळापेक्षा अधिक आहे.
भाजपा-जेएमएम युतीची चर्चा का सुरू झाली?
काही दिवसांपूर्वी हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन दिल्लीत गेले होते. याठिकाणी हेमंत सोरेन यांची भाजपाच्या वरिष्ठांसोबत भेट झाली असा दावा केला जात आहे. मंगळवारी झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीने जेएमएम आणि भाजपा युतीच्या चर्चांना हवा दिली. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हेमंत सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीकडून त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते जेलमध्येही गेले होते आणि आता जामीनावर बाहेर आहेत. बिहारमध्ये जेएमएमने महाआघाडीकडे ७ जागांची मागणी केली होती. हेमंत सोरेन यांना त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवायचे होते. परंतु तेजस्वी यादव यांनी ही मागणी फेटाळली. जेएमएमला बिहार सीमेवरील काही मतदारसंघ हवे होते. परंतु जागावाटपावरून मतभेद झाले आणि जेएमएम महाआघाडीतून बाहेर पडली. तेव्हापासून जेएमएम आणि महाआघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे.