‘हे’ जितक्या लवकर ओळखू, तितके चांगले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:28 IST2025-10-12T09:20:52+5:302025-10-12T09:28:37+5:30
समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांवर उभ्या संवैधानिक क्रांतीविरुद्ध चालवलेली ही प्रतिक्रांती या मूल्यांनाच विरोध करते आहे!

‘हे’ जितक्या लवकर ओळखू, तितके चांगले!
सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग -
न्यायमूर्ती अनेकदा मुख्य निर्णयाचा भाग नसलेल्या गोष्टीबद्दल निरीक्षणे, मतप्रदर्शन करतात. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले होते की, ‘देवाच्या भग्नावस्थेतील मूर्तीच्या स्थितीचा प्रश्न हा पुरातत्व विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो, त्यामुळे याचिकाकर्त्याने त्या विभागाकडे जावे!’ या निर्णयाच्या बाहेर जाऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनौपचारिक सल्ला दिला की, ‘याचिकाकर्त्याने देवाची मूर्ती पुन्हा पूर्ववत व्हावी म्हणून प्रार्थना करावी.’ न्या. गवई यांनी हिंदूंविषयी द्वेषभावना ठेवून किंवा त्यांचा अपमान करण्याच्या हेतूने असे वक्तव्य केले होते का? ज्यामुळे वकील राकेश किशोर (तिवारी) यांनी त्यांच्यावर जोडा फेकून अपमान करावा?
माझ्या मते, सरन्यायाधीश गवई यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित नव्हते. सनातन धर्मानुसार हिंदूंनी आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना किंवा पूजाविधी करावेत, अशी धार्मिक परंपरा आहे. सर्व पुजारी हिंदूंना त्यांच्या कल्याणासाठी पूजाविधी करण्याचा सल्ला देतात. न्या. भूषण गवई यांनी तेच केले. वकील असलेले राकेश किशोर (तिवारी) यांनी मात्र त्यांना विरोध करण्यासाठी सरन्यायाधीशांवर बूट उगारण्याचा प्रयत्न केला. असे करून त्यांनी सनातनी धर्म नियमांचेच पालन केले आहे, असेच म्हणावे लागेल. प्राचीन काळापासून या विचाराने समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा विरोध केला असून, बौद्ध धर्मासारख्या समानता आणि मानवतेचे विचार मांडणाऱ्या तत्त्वज्ञानाविरुद्ध बलप्रयोग, अन्याय आणि सामाजिक असमानतेचा अवलंब केला गेला आहे.
समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारसरणीचा असमानता, पराधीनता आणि समाजविरोधी वृत्तीवर आधारित विचारसरणीशी असलेला हा संघर्ष आहे. तसेच ही लढाई अंधश्रद्धा, कर्मकांड आणि प्रार्थना यावर आधारित धार्मिक विचारसरणी आणि विज्ञान, तर्कशक्ती व अनुभवावर आधारित सत्यवादी विचारसरणी यांच्यातीलही आहे.
राकेश किशोर (तिवारी) यांनी सांगितले की, त्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचे कृत्य देवाच्या आज्ञेप्रमाणे केले. यावरून वकील राकेश किशोर हे प्रत्यक्षात भूतकाळातील हिंसक परंपरेला वर्तमानात पुढे नेत आहेत, असे स्पष्टपणे दिसते. असमानता, पराधीनता आणि समाजविरोधी वृत्ती, तुच्छता आणि द्वेष यावर आधारित विचारसरणीच्या लोकांनी संवैधानिक क्रांती जी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर उभी आहे. तिच्याविरुद्ध चालवलेली ही प्रतिक्रांती आहे व वकील राकेश किशोर हे त्या प्रतिक्रांतीचे प्रतिनिधी आहेत. हे लोक संवैधानिक मूल्यांविरुद्ध सनातनवादी प्रतिगामी विचार पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपण जितक्या लवकर ओळखू, तितके चांगले.