बसचे छत सहा फुटांचे अन् कंडक्टर ७ फुटांचा! १० तास वाकून काम करणाऱ्या अमीनसाठी मुख्यमंत्री धावून आले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:28 IST2026-05-06T13:15:13+5:302026-05-06T13:28:46+5:30
सव्वा सहा फुटांच्या बसमध्ये कसरत करणाऱ्या कंडक्टरला सरकारने दिला मोठा दिलासा.

बसचे छत सहा फुटांचे अन् कंडक्टर ७ फुटांचा! १० तास वाकून काम करणाऱ्या अमीनसाठी मुख्यमंत्री धावून आले.
Telangana Bus Conductor: तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळात कार्यरत असलेल्या एका आगळ्यावेगळ्या कर्मचाऱ्याची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ७ फूट उंची असलेले अमीन अहमद अन्सारी यांच्या शारीरिक व्याधींची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी त्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत. आता अमीन यांची बसमधील कसरतीतून सुटका होणार असून त्यांना त्यांच्या उंचीला साजेशी नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दैनंदिन काम ठरली होती शिक्षा
अमीन अन्सारी यांची उंची ७ फूट आहे, तर सर्वसाधारण बसच्या छताची उंची अवघी ६.३९ फूट असते. यामुळे ड्युटीवर असताना अमीन यांना दिवसाचे १०-१० तास मान वाकवून आणि कसाबसा रस्ता काढत प्रवाशांना तिकिटे द्यावी लागत. बसची रचना त्यांच्या उंचीसाठी अत्यंत गैरसोयीची असल्याने त्यांना सतत मानदुखी, पाठदुखी आणि झोप न मिळणे अशा समस्यांनी ग्रासले होते.
अनुकंपा तत्त्वावर मिळाली होती नोकरी
अमीन हे चंद्रयानगुट्टा येथील रहिवासी आहेत. २०२१ मध्ये त्यांचे वडील, जे कचगुडा आगारात हेड कॉन्स्टेबल होते, त्यांच्या निधनानंतर अमीन यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. सुरुवातीला त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी प्रयत्न केला, मात्र शारीरिक चाचणीत यश न मिळाल्याने त्यांना मेहदीपट्टणम आगारात कंडक्टर म्हणून रुजू व्हावे लागले.
मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ दखल
अमीन यांची व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचली. याची दखल घेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांना अमीन यांच्यासाठी सोयीस्कर भूमिका शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. सज्जनर यांनी अमीन यांना बसमधील ड्युटीतून मुक्त करून आऊट ऑफ डेझिग्नेशन ड्युटी देण्याचे आदेश काढले आहेत.
आता कुठे काम करणार अमीन?
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, अमीन यांना आता अशा ठिकाणी काम दिले जाईल जिथे त्यांना सतत वाकावे लागणार नाही. यामध्ये, बस पास विभाग, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यालय किंवा महामंडळाच्या इतर प्रशासकीय कामांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाईल.
"बसमध्ये काम करताना मला सतत मान वाकवून राहावे लागत होते. हे माझ्या आरोग्यासाठी खूप त्रासदायक होते. बसची रचना माझ्यासारख्या लोकांसाठी बनलेली नाही," असं अमीन अहमद अन्सारी म्हणाले.