भीषण रस्ते अपघात: उभ्या ट्रकला कारची धडक; कोब्रा बटालियनच्या ४ जवानांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:31 IST2026-02-14T13:26:17+5:302026-02-14T13:31:19+5:30

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कोब्रा बटालियनच्या चार जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

Terrible road accident: Car hits parked truck; 4 Cobra battalion jawans die tragically | भीषण रस्ते अपघात: उभ्या ट्रकला कारची धडक; कोब्रा बटालियनच्या ४ जवानांचा दुर्दैवी मृत्यू

भीषण रस्ते अपघात: उभ्या ट्रकला कारची धडक; कोब्रा बटालियनच्या ४ जवानांचा दुर्दैवी मृत्यू

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. खपरी गावाजवळ बायपास रोडवर उभ्या असलेल्या एका ट्रकला जवानांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कोब्रा बटालियनच्या चार जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात आणि सुरक्षा दलात शोककळा पसरली आहे.

कारचा चक्काचूर, गॅस कटरने बाहेर काढले मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, कोब्रा बटालियनचे जवान जगदलपूरहून रायपूरच्या दिशेने शासकीय कामासाठी जात होते. धमतरी येथील खपरी गावाजवळ पोहोचले असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या कारने भीषण धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, कारचा पुढचा भाग अक्षरशः चिरडला गेला. कारमधील जवान रक्ताच्या थारोळ्यात आतच अडकून पडले होते. स्थानिक नागरिक आणि अर्जुनी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारचा पत्रा कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला, त्यानंतरच जवानांना बाहेर काढण्यात यश आले.

दोन जणांचा जागीच मृत्यू, दोन जणांनी वाटेतच सोडला प्राण

या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघांनी रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच प्राण गळला. एक जवान गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहीद जवानांची नावे

या भीषण अपघातात शहीद झालेल्या जवानांची ओळख पटली असून, मृतांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे:

मुकेश कुमार (हेड कॉन्स्टेबल)

उमेंद्र सिंह (एएसआय)

राजकुमार गौड (कॉन्स्टेबल)

हिरा लाल नागर (चालक, रा. पडरिया, रीवा)

या अपघातात अभिमान राय नावाचा जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उभा ट्रक ठरला जवानांचा काळ!

प्राथमिक तपासानुसार, रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे किंवा धोकादायक स्थितीत उभा असलेला ट्रक या भीषण अपघाताचे मुख्य कारण ठरला आहे. रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या अंधारात उभ्या असलेल्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा घात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. एकाच वेळी चार जवानांच्या मृत्यूने संपूर्ण सुरक्षा दलावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title : भीषण सड़क दुर्घटना: खड़ी ट्रक से कार टकराई, 4 जवानों की मौत

Web Summary : छत्तीसगढ़ में भीषण सड़क हादसा: खड़ी ट्रक में कार की टक्कर से कोबरा बटालियन के चार जवानों की मौत हो गई। एक गंभीर रूप से घायल। जवान शासकीय कार्य से जा रहे थे। जांच जारी है।

Web Title : Fatal Road Accident: Car Hits Parked Truck, 4 Soldiers Dead

Web Summary : Chhattisgarh accident: Car rammed a parked truck, killing four Cobra Battalion soldiers. One critically injured. The soldiers were en route for official work. Investigation underway.