रनवेवर उतरत असताना तेजस फायटर जेटचे ब्रेक फेल झाले; हवाई दलाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 08:19 IST2026-02-23T08:17:06+5:302026-02-23T08:19:06+5:30
Brake failure Tejas aircraft accident : भारतीय हवाई दलाचे तेजस विमान लँडिंग दरम्यान अपघाताग्रस्त झाले आहे. खबरदारी म्हणून ३० विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. सविस्तर बातमी वाचा.

रनवेवर उतरत असताना तेजस फायटर जेटचे ब्रेक फेल झाले; हवाई दलाने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान 'तेजस' पुन्हा एकदा अपघाताचे बळी ठरले आहे. एका महत्त्वाच्या एअरबेसवर लँडिंग करताना झालेल्या या दुर्घटनेमुळे हवाई दलाने खबरदारीचा उपाय म्हणून तेजस विमानांच्या ताफ्यातील सुमारे ३० विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ च्या सुमारास एका प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना तेजस विमानाला लँडिंगच्या वेळी समस्या आली. प्राथमिक तपासानुसार, विमानाची 'ब्रेक यंत्रणा' निकामी झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून ते पुन्हा सेवेत येण्याची शक्यता कमी आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता वैमानिकाने वेळीच प्रसंगावधान राखले आणि 'इजेक्शन' प्रक्रियेद्वारे स्वतःचा जीव वाचवला. वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
हवाई दलाचे मोठे पाऊल
या घटनेनंतर हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत तांत्रिक तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत तेजस विमानांचे उड्डाण रोखण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांतील हा तिसरा मोठा अपघात असल्याने स्वदेशी विमान कार्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
तेजस विमानाच्या दुबई एअरशो मधील अपघाताने जगाचे लक्ष वेधले होते. यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. यापूर्वी मार्च 2024 मध्ये जैसलमेरजवळ तेजस विमानाचा अपघात झाला होता. या अपघातांच्या मालिकेमुळे स्वदेशी तेजय विमाने तपासली जाणार आहेत.