देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:35 IST2025-07-30T19:32:40+5:302025-07-30T19:35:45+5:30

बीड जिल्ह्यात झालेल्या दोन हत्यांचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत मांडला. राज्यातील गृह मंत्रालय या प्रकरणावर कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी केली. 

Supriya Sule demanded a CBI inquiry into the murder cases of Santosh Deshmukh and Mahadev Munde from Union Home Minister Amit Shah in the Lok Sabha | देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी

देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी

Supriya Sule on Santosh Deshmukh Mahadev Munde case in lok sabha: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. महाराष्ट्रातील गृह मंत्रालय कारवाई करत नाहीये. महाराष्ट्र सरकार दोन्ही कुटुंबांना न्याय देत नाहीये. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्याकडे लोकसभेत केली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

लोकसभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा जिल्हा आहे बीड जिल्हा. अतिशय सुसंस्कृत जिल्हा. महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठं योगदान बीड जिल्ह्याचे राहिलेले आहे. भाजपचे नेते राहिलेले गोपीनाथ मुंडे सुद्धा बीड जिल्ह्यातूनच येतात. दुर्दैवाने एक-दोन वर्षामध्ये अनेक अशा घटना बीड जिल्ह्यात झाल्यात, त्या महाराष्ट्राला नाही, तर माणुसकीलाही शोभणाऱ्या नाहीत." 

गृह मंत्रालय त्यावर अजूनही कारवाई करत नाहीये -सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोन्ही हत्या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या. सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली. ही अयोग्य घटना झाली, हे मान्य करत आहेत. पण, महाराष्ट्राचे गृह मंत्रालय अजून त्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये", असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.  

"माझी विनंती आहे देशाच्या गृह मंत्र्यांना की, संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांच्या आणि अशा अनेक केसेस आहेत, त्या संपूर्ण भागात... ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत. पण, त्या कुटुंबांना न्याय मिळत नाहीये. आज संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबातील लोक न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत", असे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सांगितले. 

'संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा'

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आमदार खासदारांना भेटत आहे. मी सुद्धा दोन्ही कुटुंबांची भेट घेतली आहे. ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत. पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये. देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी माझी केंद्रीय गृह मंत्र्यांना आहे", असा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. बीड जिल्ह्यात अशाच घटना सातत्याने घडत असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला. 

Web Title: Supriya Sule demanded a CBI inquiry into the murder cases of Santosh Deshmukh and Mahadev Munde from Union Home Minister Amit Shah in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.