‘महिला आरक्षणास या क्षणापासून पाठिंबा पण...’, राहुल गांधी यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:42 IST2026-04-18T06:41:23+5:302026-04-18T06:42:30+5:30
Women's Reservation: महिला आरक्षण आता या क्षणापासून लागू करण्यास आमचा पाठिंबा आहे. तो कायदा, आधीचा हवा. पण भारतातील दक्षिण, ईशान्य आणि लहान राज्यांच्या भारतीय संघराज्यातील प्रतिनिधित्वाला धक्का लावण्याची परवानगी विरोधक सरकारला देणार नाहीत असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला दिला.

‘महिला आरक्षणास या क्षणापासून पाठिंबा पण...’, राहुल गांधी यांचं सूचक विधान
नवी दिल्ली - महिला आरक्षण आता या क्षणापासून लागू करण्यास आमचा पाठिंबा आहे. तो कायदा, आधीचा हवा. पण भारतातील दक्षिण, ईशान्य आणि लहान राज्यांच्या भारतीय संघराज्यातील प्रतिनिधित्वाला धक्का लावण्याची परवानगी विरोधक सरकारला देणार नाहीत असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला दिला. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनाही अशाच प्रश्नांचा सामना करावा लागला होता; परंतु त्यांनी त्यातील धोके ओळखले. मात्र, सध्याचे केंद्र सरकार सध्या जी कृती करत आहे तशा हालचाली आधीच्या पंतप्रधानांनी कधीही केल्या नाहीत.
चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी नर्मविनोदी शैलीत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्या आयुष्यात पत्नी हा मुद्दाच नाही. महिलावर्गाकडून प्रत्येकजण खूप काही शिकत असतो. राष्ट्रीय विचारसरणी घडविण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. लोकसभेतील आपण सर्वजण महिलांच्या कामगिरीमुळे प्रभावित आहोत. पंतप्रधान, मी आमचा पत्नी या विषयाशी काहीही संबंध नाही. आम्हाला तो अनुभव आम्हाला मिळाला नाही. पण, आम्ही आई, बहीण यांच्याकडून नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत.
राहुल गांधी यांनी घातले ‘१६’चे कोडे
राहुल गांधी यांनी आपली आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसोबतचा एक प्रसंग सांगितला आणि लोकसभेत १६ एप्रिलचा उल्लेख करत सूचक विधान केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांमध्ये कमी उत्साह होता.
अचानक माझ्या लक्षात आले की, ती तारीख १६ एप्रिल आहे. अरे देवा, किती विचित्र! आकडा : १६. माझ्या कोड्याचे उत्तर १६ आहे. जर कोणाला हे समजले असेल, तर त्यांनी मला संदेश पाठवावा.’ मात्र नंतर काँग्रेस नेत्यांनी निदर्शनास आणून दिले की १६ला इंग्रजीत ‘सिस्क्टिन’ म्हणतात. त्याचा उच्चार 'एपस्टाइन' या नावाशी जुळतो.
मला २० वर्षांत जमले नाही ते प्रियांकांनी ५ मिनिटांत केले
राहुल गांधी म्हणाले की, माझी बहीण व खासदार प्रियांका गांधी यांनीही गुरुवारी पाच मिनिटांच्या कालावधीत उत्तम भाषण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हसविणे मी माझ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत करू शकलो नाही. ती गोष्ट प्रियांका यांनी साध्य करून दाखविली असे राहुल गांधी यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
राहुल गांधींनी माफी मागावी : राजनाथ सिंह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. द्रमुकच्या नेत्या कनिमोळी म्हणाल्या की, विधेयकाच्या निषेधार्थ द्रमुकचे खासदार गुरुवारी लोकसभेत काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते. हे आंदोलन म्हणजे काळा तिलक आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. मात्र, काळा रंग हा देवी कालीमातेचा रंग आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे त्या म्हणाल्या.