आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:44 IST2025-05-16T13:43:50+5:302025-05-16T13:44:21+5:30
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
'आई' या शब्दात संपूर्ण जग सामावलेले आहे. प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा सर्वस्व असतो. परंतु राजस्थानमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासला आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये 80 वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्यात आला. स्मशानभूमीत चितेसाठी लाकडाची व्यवस्थाही करण्यात आली, पण अचानक मृत आईऐवजी तिचा मुलगा चितेवर झोपला. आईवरील प्रेमामुळे नाही, तर चांदीच्या एका तुकड्यासाठी...
सविस्तर माहिती अशी की, जयपूर ग्रामीणमधील विराटनगर भागात ही घटना घडली. 3 मे रोजी 80 वर्षीय छितर रेगर यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर मुलांनी अंत्ययात्रा काढली आणि तिला जवळच्या स्मशानभूमीत नेले. अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह चितेवर ठेवण्यापूर्वी महिलेच्या अंगावरील दागिने मोठा मुलगा गिरधारी लाल याच्या हातात दिले. हे पाहून त्याचा धाकटा भाऊ ओमप्रकाश संतापला आणि चितेवर झोपला. मला आईच्या सगळ्या चांदीच्या साखळ्या द्या, नाहीतर मी येथून उठणार नाही, स्वतःला जाळून घेईन, असा आरडाओरड करू लागला.
इंसान किधर जा रहा है ?
— Mukesh Mathur (@mukesh1275) May 16, 2025
राजस्थान के कोटपूतली में चांदी के कड़े के लिए बेटे ने माँ का अंतिम संस्कार रोका! अर्थी पर लेट गया।#rajasthanpic.twitter.com/3kUg1XPlr1
स्मशानभूमीत मुलाचे कृत्य पाहून नातेवाईक, कुटुंब आणि समाजातील लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, आईचा अंत्यविधी होऊ दे, असा सल्ला त्याला दिला, परंतु मुलाने बराच वेळ गोंधळ घातला. शेवटी गावातील लोकांनी त्याला जबरदस्तीने चितेवरुन उचलले. या सर्व गोंधळामुळे दोन तास उशीराने महिलेवर अंत्यविधी पार पाडण्यात आला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
एवढेच नाही, तर गुरुवारी महिलेच्या तेराव्याच्या दिवशी स्मशानभूमीत गोंधळ घालणाऱ्या मुलाने आईच्या विधींमध्ये भाग घेतला नाही. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओमप्रकाश आणि त्याच्या इतर भावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेवरून वाद सुरू आहे. यामुळे ओमप्रकाश गावाबाहेर वेगळ्या घरात राहतो. सध्या हा विषय गावात हास्याचा विषय बनला आहे.