हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:56 IST2026-01-12T11:55:52+5:302026-01-12T11:56:45+5:30
टोलचे १०० रुपये वाचवण्याच्या नादात चंदीगडहून परतणाऱ्या भावा-बहिणीने असा 'शॉर्टकट' घेतला, ज्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली.

फोटो - nbt
टोलचे १०० रुपये वाचवण्याच्या नादात चंदीगडहून परतणाऱ्या भावा-बहिणीने असा 'शॉर्टकट' घेतला, ज्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची नवी कोरी कार थेट तलावात कोसळली. या भीषण अपघातात भावाचा मृत्यू झाला, तर सुदैवाने त्याच्या बहिणीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू असं या तरुणाचं नाव आहे. हिमांशू चंदीगडमधील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी दुपारी तो आपली बहीण तान्यासह घरी परतत होता. तान्या कारच्या मागच्या सीटवर बसली होती. मिल्क माजरा टोल प्लाझाजवळ पोहोचल्यावर हिमांशूने १०० रुपयांचा टोल टॅक्स वाचवण्यासाठी गावातून जाणारा पर्यायी रस्ता निवडला. हा रस्ता अतिशय अरुंद होता आणि रस्त्याच्या कडेला खोल तलाव होता.
कारची काच फोडून भाऊ-बहिणीला बाहेर काढल
कान्हडी खुर्द गावाजवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाला जागा देताना हिमांशुचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट तलावात जाऊन पडली. अपघातानंतर लगेचच मोठ्या संख्येने ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि कारची काच फोडून दोन्ही भाऊ-बहिणीला बाहेर काढलं.
हिमांशूचा मृत्यू, तान्याला गंभीर दुखापत
उपचारासाठी तातडीने नागरी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी हिमांशूला मृत घोषित केलं. तान्याला गंभीर दुखापत झाली असून तिचे काही दातही तुटले आहेत. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिमांशूचे वडील कृष्ण लाल यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच कुटुंबाने 'टोयोटा टायझर' ही नवी कार खरेदी केली होती.
पोलीस तपास सुरू
तान्याच्या परीक्षेसाठी आधी कॅब बुक करण्यात आली होती, पण हिमांशूने स्वतः तिला सोडण्याचा आणि परत आणण्याचा निर्णय घेतला होता. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशुच्या लग्नाची चर्चाही घरात सुरू होती. छप्पर पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. हिमांशुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.