Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:17 IST2026-04-07T12:05:25+5:302026-04-07T12:17:54+5:30
Skymet Monsoon Forecast 2026: यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज
Rainfall Prediction 2026 in India: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. याचदरम्यान, आता यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांदरम्यान सरासरीच्या ९४ टक्के एवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
बदलत चाललेलं हवामान आणि ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतात बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीकडे शेतकऱ्यांसह देशातील आर्थिक विश्वाचं लक्ष लागलेलं असतं. दरम्यान, यावर्षीही मान्सूनवर परिणाम करणाऱ्या एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे स्कायमेटने यंदाच्या मान्सूनसाठीचा आपला अंदाज जाहीर करताना म्हटले आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हंगामाच्या दुसऱ्या सहमाहीतही एल निनोची तीव्रता वाढणार आहे. तसेच त्याचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीपैकी जून महिन्यामध्ये मान्सून हा स्थिर राहणार आहे. तर जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाची तीव्रता कमी होणार आहे. तसेच एकूण जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९४ टक्के एवढं पर्जन्यमान होईल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतीला बसू शकतो. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून देशातील मान्सूनसाठीचा आपला पहिला अंदाज पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.