हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:57 IST2025-12-06T13:56:01+5:302025-12-06T13:57:53+5:30
एका शाळेत परीक्षेदरम्यान सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका शाळेत परीक्षेदरम्यान सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मोंट फोर्ट इंटर कॉलेजमध्ये परीक्षा देत असताना अमेय सिंह (१२) हा सहावीत शिकणारा विद्यार्थी अचानक खाली कोसळला. अमेयला न्यूरोलॉजिकल आजार होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
जानकीपुरम येथील रहिवासी अमेय सिंह (१२) हा इंग्रजीची परीक्षा देऊन आपल्या डेस्कवर परतत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो बेशुद्ध पडला. या घटनेने शाळा प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला. महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं की, परीक्षा सकाळी ८ वाजता सुरू झाली होती. अमेयने अडीच तास पेपर लिहिला, पाणी प्यायला, पेपर दिला आणि खाली पडला. शिक्षकांनी ताबडतोब त्याला मदत केली. शाळेत सीपीआर दिला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याची प्रकृती पाहून शाळा प्रशासनाने त्याला भाऊराव देवरस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं.
रुग्णालयातील डॉक्टरांनी बराच वेळ सीपीआर दिला, परंतु अमेयने कोणतीही हालचाल केली नाही. बीआरडी मेट्रोपॉलिटन हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित दीक्षित यांनी सांगितलं की, मुलाला सकाळी ११:०५ वाजता बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आलं. इमर्जन्सी टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ११:२९ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं. म्हणजेच रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
महानगर पोलीस स्टेशनचे अधिकारी अखिलेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वडिलांच्या विनंतीवरून पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला आणि मृतदेह कुटुंबाला सोपवला. मुलाचे वडील संदीप सिंह यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. अमेयच्या अचानक मृत्यूने शाळा, कुटुंब आणि संपूर्ण कॉलनीला मोठा धक्का बसला आहे.