'न्यायमूर्ती होण्यास शेखर कुमार यादव योग्य नाहीत'; चंद्रचूड यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांना पाठवले होते पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:11 IST2024-12-21T12:06:19+5:302024-12-21T12:11:23+5:30
Shekhar Kumar Yadav D Y Chandrachud: देश बहुसंख्याकांच्या मताने चालेल असे विधान केल्यामुळे वादात सापडलेले न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या नियुक्तीला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विरोध केला होता. २०१८ मध्ये त्यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांना पत्र पाठवले होते.

'न्यायमूर्ती होण्यास शेखर कुमार यादव योग्य नाहीत'; चंद्रचूड यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांना पाठवले होते पत्र
Shekhar Kumar Yadav D Y Chandrachud News: इलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती करण्यासाठी शेखर कुमार यादव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, तेव्हा त्याला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विरोध केला होता. २०१८ मध्ये दीपक मिश्रा हे सरन्यायाधीश होते,तेव्हा चंद्रचूड यांनी पत्र पाठवून शेखर यादव हे न्यायमूर्ती होण्यास योग्य नाहीत, असे स्पष्ट सांगितले होते. 'द लीफलेट'ने या संदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
द लीफलेट ही कायदेविषयक रिपोर्ट प्रसिद्ध करते. यात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र पाठवले होते. ज्यात त्यांनी शेखर कुमार यादव यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला होता. शेखर कुमार यादव हे इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी योग्य नाहीत असे स्पष्ट त्यांनी मांडले होते.
शेखर कुमार यादव यांची नियुक्ती कशी झाली?
रिपोर्टनुसार, ऑगस्ट 2018 मध्ये चंद्रचूड यांनी पत्र पाठवले होते. त्यानंतर २५ सप्टेंबर २०१८ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या तीन सदस्यीय कॉलेजियमने १६ वकिलांच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याला स्थगिती दिली. यात शेखर कुमार यादव यांच्या नावाचाही समावेश होता.
ऑक्टोबर २०१८ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा सेवानिवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती रंजन गोगोई हे सरन्यायाधीश बनले. त्यांच्या कार्यकाळात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करून शेखर कुमार यादव यांची इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती.
धनंजय चंद्रचूड यांनी पत्रात काय म्हटले होते?
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होण्यापूर्वी धनंजय चंद्रचूड यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केलेले आहेत. दिलीप बाबासाहेब भोसले यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना शेखर कुमार यादव यांच्या नावाची १४ फेब्रुवारी २०१८ मध्ये कॉलेजियमकडे शिफारस केली होती. त्यावेळी चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने धनंजय चंद्रचूड यांना नियुक्तबद्दल सल्ला मागितला होता. त्यानंतर चंद्रचूड यांनी शेखर यादव यांची नियुक्ती न करण्याचा सल्ला दिला होता.
चंद्रचूड यांनी पत्रात म्हटले होते की, "शेखर कुमार यादव एक सहायक सरकारी वकील आहेत. त्यांना कामाचा कमी अनुभव आहे आणि ते सर्वसाधारण वकील आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय सदस्य आहेत. ते भाजपच्या एका राज्यसभा खासदाराचे निकटवर्तीय आहेत. त्याशिवाय त्यांची भाजपच्या मीडिया सेलचे सदस्य डॉ. एल.एस. ओझा यांच्याशी जवळचे संबंध आहेत."
याच पत्रात चंद्रचूड यांनी म्हटले होते की, "असे कळले की, इलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अशोक मेहतांच्या राजकीय संबंधांमुळे त्यांची शिफारस करण्यात आली आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यासाठी ते योग्य नाहीत", असे चंद्रचूड यांनी म्हटले होते.
त्यावेळचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नियुक्तीला स्थगिती दिली. पण रंजन गोगोई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर शेखर कुमार यादव यांना इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्त करण्यात आले.