CoronaVirus News: रशियाची लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची प्रतीक्षा; भारतातील चाचण्या मार्चमध्ये होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:20 IST2020-07-19T22:26:11+5:302020-07-20T06:20:52+5:30
रशिया बनवत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार असल्याचे जाहीर झाले आहे.

CoronaVirus News: रशियाची लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची प्रतीक्षा; भारतातील चाचण्या मार्चमध्ये होणार पूर्ण
नवी दिल्ली : संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना संसर्गावर प्रायोगिक तत्त्वावर १३० लसी बनविण्यात आल्या असून, त्यांच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी रशियातील लस आॅगस्टममध्ये सर्वांसाठी उपलब्ध होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. तर, चीनची सिनोव्हॅक बायोटेक कंपनी बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. भारत बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रशिया बनवत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तसे घडल्यास लसीचा सर्वप्रथम शोध लावण्याचा मान त्या देशाला मिळेल. लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचा दावा मॉस्को वैद्यकीय विद्यापीठाने केला आहे. चीनमधील सिनोव्हॅक बायोटेक कंपनीने बनविलेल्या लसीच्या अबुधाबी येथे हजार जणांवर चाचण्या करण्यात येत आहेत. लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. चीनमध्ये चार ठिकाणी लस बनविण्याचे प्रयोग स्वतंत्रपणे सुरू आहेत.
इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ व इम्पेरिअल कॉलेज बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा व तिसरा टप्पा सुरू आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. ६ हजार जणांना ही लस टोचण्यात येईल.
भारतामध्ये कोव्हॅक्सिन व झायकोव्ह-डी या दोन लसींच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा सुरू आहे. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची भारत बायोटेक कंपनी व झायकोव्ह-डी ही लस झायडस या कंपनीकडून बनविण्यात येत आहे. मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण होण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे.