आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 08:36 IST2025-11-21T08:35:56+5:302025-11-21T08:36:52+5:30
मागील ४-५ वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. मला युवकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल असंही मंत्री दीपक प्रकाश यांनी सांगितले.

आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
पटना - बिहारच्या निवडणूक निकालात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. नुकतेच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह इतर २६ जणांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात राष्ट्रीय लोक मोर्चा(RLM)चे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी त्यांचा मुलगा दीपक प्रकाशला त्यांच्या कोट्यातून एकमेव मंत्रिपद दिले त्यामुळे सगळे हैराण झाले. दीपक प्रकाश ना विधानसभेचे आमदार आहेत, ना विधान परिषदेचे आमदार आहेत. एनडीएच्या जागावाटपात उपेंद्र कुशवाह नाराज होते, त्यांच्या पक्षाला केवळ ६ जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुशवाह यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पक्षाला विधान परिषदेची एक जागा देण्याचं आश्वासन देण्यात आले होते.
बिहारच्या नव्या मंत्रिमंडळात नवीन चेहरा म्हणून उपेंद्र कुशवाहा यांचा मुलगा दीपक प्रकाश यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, मी राजकारणात नवीन नाही. लहानपणापासून राजकारण जवळून पाहत आलोय. काम करताना पाहिलं आहे. मी स्वत: राजकारणात काम करतोय. माझं नाव मंत्रिपदासाठी का निवडले, ते पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा हेच सांगू शकतात. शपथ घेण्याच्या काही तास आधीच मला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे ते कळलं अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.
#WATCH पटना, बिहार: राष्ट्रीय लोक मोर्चा प्रमुख उपेंद्र कुशवाहा के बेटे और बिहार के मंत्री दीपक कुशवाहा ने कहा, "हमें जिम्मेदारी का एहसास हो रहा है। हम संकल्पित हैं कि जिम्मेदारी पर खरा उतरना है।" pic.twitter.com/igY7SbTvkd
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2025
तसेच येणाऱ्या काळात युवकांसाठी काम करायचे आहे. एनडीएने लोकांच्या मनातील संशय दूर करण्याचं काम केले. नोकरी आणि रोजगार यावर काम होत आहे. पुढील ५ वर्षात आणखी रोजगार उपलब्ध होतील. जवळपास ३० लाख युवकांना रोजगार मिळेल. त्यात आधुनिक कोर्सेसचा समावेश आहे. ज्यातून आपल्या राज्यातील युवकांच्या हाताला चांगला रोजगार उपलब्ध होईल. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आयटी सेक्टरमध्ये ४ वर्षापासून काम करतोय. मागील ४-५ वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. मला युवकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल असंही मंत्री दीपक प्रकाश यांनी सांगितले.
दरम्यान, उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएमने ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवला आहे. त्या ४ जागांमध्ये सासाराम मतदारसंघात कुशवाहा यांची पत्नी स्नेहलता २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. मात्र मंत्रिपदासाठी कुशवाह यांनी निवडून आलेल्यांवर भरवसा न ठेवता स्वत:च्या मुलावर विश्वास ठेवत त्याला मंत्रिपद दिले आहे. राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाहा यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचा नवा पक्ष स्थापन केला होता. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी ४ जागा जिंकत नितीश कुमार सरकारमध्ये १ मंत्रिपद मिळवले आहे. त्यात कुशवाहा यांनी मुलाला मंत्रिपद आणि पत्नीला आमदारकी देत २०३० पर्यंत त्यांचा पक्ष मजबूत ठेवण्याचं काम केले आहे.