बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 06:43 IST2025-10-19T06:43:08+5:302025-10-19T06:43:16+5:30
बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले.

बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांत एनडीए आघाडीच पुन्हा विजयी होणार, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी व्यक्त केला. ‘इंडिया आघाडीमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणण्याचा इरादा आहे,’ अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करताना शाह यांनी सांगितले की, केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार असल्याने बिहारची उत्तम प्रकारे प्रगती होत आहे. त्यातून त्या राज्याला बरेच काही साध्य करता येईल. मात्र नवा मुखवटा धारण केलेला राजद बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणू इच्छित असून त्यामुळे जनतेने सावध राहावे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘निकालानंतरच भाष्य’
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाबद्दल शाह म्हणाले की, त्यांचा नवा पक्ष असून तो पहिल्यांदाच निवडणुका लढविणार आहे. मतदान व निकाल घोषित झाल्यानंतर मी याबाबत भाष्य करीन. बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे, असेही ते म्हणाले.