राजस्थानात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:31 IST2026-01-06T10:31:07+5:302026-01-06T10:31:07+5:30
प्रार्थनासभेतच महत्त्वाच्या बातम्यांचे सामूहिक वाचन.

राजस्थानात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन अनिवार्य
लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनंतर आता राजस्थानातील भजनलाल शर्मा यांच्या सरकारनेही शाळकरी मुलांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन अनिवार्य केले आहे. मुलांना सोशल मीडियापासून दूर करण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, शाळांच्या प्रार्थनेच्या वेळेत दररोज १० मिनिटे महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि क्रीडाविषयक बातम्यांचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी दररोज पाच नव्या शब्दांची माहिती मुला-मुलींना देण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर सोपवण्यात येईल.
उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कमीतकमी दोन वर्तमानपत्रे (एक इंग्रजी आणि एक हिंदी), तर प्रत्येक शासकीय उच्च प्राथमिक शाळेत हिंदी भाषेतील दोन वर्तमानपत्रे मागवावीत, असे निर्देश सरकारने जीआरद्वारे दिले आहेत. अशाच प्रकारे इग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळांमध्ये दोन वर्तमानपत्रे मागवावीत, असे जीआरमध्ये म्हटले आहे. शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रीय पातळीवरील एका इंग्रजी आणि एका हिंदी वर्तमानपत्राचे वाचन केले जाईल.
शब्दसाठा वाढवण्याचा प्रयत्न
वर्तमानपत्र वाचनादरम्यान विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. रोज पाच नवे शब्द निवडावेत. त्यांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगावेत आणि त्यांचा वाक्यात उपयोगही शिकवावा, अशी सूचना शिक्षकांना दिली आहे.
सामान्य ज्ञानात भर
वाचनामुळे वर्तमानपत्रांची आवड निर्माण हाेऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल. भाषेबरोबरच विचार करण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त हाेत आहे.
खर्चाचा भार शाळांवर नाही
वर्तमानपत्राचा सर्व खर्च राजस्थानशिक्षण परिषद करणार आहे. त्यामुळे शाळा, संस्थांवर भार पडणार नाही. विद्यार्थ्याला वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे.
सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी
आजच्या बदलत्या युगात मुले आपला जास्तीत जास्त वेळ मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवतात. परिणामी त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्र वाचण्याचा हा उपक्रम मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवून ज्ञानाकडे नेण्याचा चांगला प्रयत्न आहे. वर्तमानपत्र वाचनामुळे केवळ मुलांच्या माहितीतच भर पडत नाही, तर त्यांची वाचनाची गती, समज आणि भाषा याबाबतीतही सकारात्मक बदल घडतो, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांचे वाचन करण्यास लावण्याबरोबरच त्यांच्या भाषा सुधारणेवरही भर दिला जाईल. त्यासाठी शिक्षकही विद्यार्थ्यांना वाचनाच्या पद्धती शिकवतील.