राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:13 IST2026-01-05T18:13:02+5:302026-01-05T18:13:38+5:30
राजस्थानमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य १४ जण जखमी झाले आहेत.

राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
राजस्थानमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य १४ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी (५ जानेवारी) ही माहिती दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री जालोर जिल्ह्यात महामार्गावर स्लीपर बस उलटल्याने एका वृद्ध दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले.
दुसरा अपघात सीकर जिल्ह्यात झाला आहे. सोमवारी पहाटे एका वेगवान कार आणि प्रवाशांनी भरलेल्या वाहनामध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात जालोरमधील आहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला, जिथे सांचौरहून करौलीला जाणारी एक खासगी बस अपघाताची बळी ठरली. पोलिसांनी सांगितलं की, भरधाव वेगात असलेल्या बसचं नियंत्रण सुटलं आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून उलटली. अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. मृतांमध्ये सांचौरचे रहिवासी असलेले फगलूराम (७५) आणि त्यांच्या पत्नी हाउ देवी (६५) यांचा समावेश आहे. हे दाम्पत्य अजमेरला जात होतं. याशिवाय भरतपूर येथील अमृतलाल नावाच्या अन्य एका प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सीकर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी पहाटे रींगस-खाटूश्यामजी रोडवर कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकेत झाला. लांपुवा गावाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात अजय देवंदा (३५), गौरव सैनी (२२) आणि अजय सैनी (२५) यांचा मृत्यू झाला. यातील दोन जखमींवर जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.