स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणातील तक्रारदार असलेले सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी आता कोर्टात एक अर्ज सादर केला आहे. त्यामधून त्यांनी राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण पुरावा मिळाल्याबाबत कोर्टाची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा आकोप केला आहे.
सात्यकी सावरकर यांनी हा अर्ज १३ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल केला आहे. या प्रकरणी पुण्यातील न्यायदंडाधिकारी कोर्टामध्ये खटला सुरू आहे. राहुल गांधी यांनी मानहानिकारक भाषणाचा व्हिडीओ आपल्याला मिळाला नाही, असं जाणीवपूर्वक सांगून कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला. राहुल गांधी यांच्या वकिलाने याबाबतचा व्हिडीओ आपल्याला मिळाल्याचे मान्य केले होतो, याचा पुरावा सात्यकी सावरकर यांनी कोर्टात सादर केला.
सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी कोर्टाला सांगितले की, २९ जुलै २०२५ रोजी राहुल गांधी यांनी एक १५ पानी पत्र लिहून लिखित जबाब दिला होता. यामध्ये त्यांनी आपल्याला सावरकरांची मानहानी करणारं कथित भाषण असलेला व्हिडीओ मिळाल्याचे नाकारले होते.
सात्यकी सावरकर यांनी आरोप केला की, राहुल गांधी यांनी कोर्टाला पत्र लिहून केलेला दावा खोटा आहे. त्यांनी या माध्यमातून जाणीवपूर्वक कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर उत्तरदायित्वापासून वाचता यावे यासाठी राहुल गांधी यांनी बनावट रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न केला, असा दावाही या याचिकेमधून करण्यात आला. आता सात्यकी सावरकर यांनी या प्रकरणी कोर्टाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे.