Prime Minister Modi's big announcement, the poor will get free food for another 5 months | पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात उदभवलेली गंभीर परिस्थिती आणि लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावाबाबत मोदी बोलतील, असा देशवासियांना अंदाज होता. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा मोदींनी केली. त्यानुसार, देशातील 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणइ एक किलो चना डाळ आणखी 5 महिने मोफत मिळणार आहे.

 

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचं असल्याचं मोदींनी आजच्या भाषणात म्हटलं. 

पावसाळ्यादरम्यान आणि त्यानंतर मुख्यत्वे कृषिक्षेत्रात जास्त काम होतं... अन्य क्षेतांमध्ये थोडी सुस्ती असते, असे म्हणत मोदींनी काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. तसेच, जुलैपासून हळूहळू सणांचं वातावरण... ५ जुलै गुरुपौर्णिमा, मग श्रावण, १५ ऑगस्ट, जन्माष्टमी, गणपती.... सणासुदीचा काळ गरजाही वाढवतो आणि खर्चही वाढवतो. या गोष्टी लक्षात ठेवून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि षटपूजा म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी जाहीर केले. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणारी ही योजना नोव्हेंबरमध्येही सुरू राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. सरकारद्वारा या पाच महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक बंधु-भगिनींंना ५ किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला 1 किलो हरभरा डाळही मोफत मिळेल. या योजनेच्या विस्तारात ९० हजार कोटीहून अधिक खर्च झाला असून गेल्या तीन महिन्यांचा खर्चही जोडला तर दीड लाख कोटी रुपये खर्च होतात, असेही मोदींनी सांगितले.

आम्ही संपूर्ण भारतासाठी स्वप्न पाहिलं आहे, एक राष्ट्र, एक रेशनकार्ड योजना सुरु करण्यात येत आहे. याचा सगळ्यात मोठा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगार किंवा अन्य गरजांसाठी गाव सोडून अन्यत्र जातात, अन्य राज्यात जातात. सरकार आज गरिबांना, गरजूंना मोफत  धान्य देऊ शकतेय, तर त्याचं श्रेय मुख्यत्वे दोन वर्गांना जात असून मेहनती शेतकरी आणि प्रामाणिक करदाते असे मोदी म्हणाले. आपले परिश्रम, समर्पण या जोरावरच देश ही मदत करू शकतोय. आज देशाचं अन्न भांडार भरलंय म्हणूनच गरीबांच्या घराची चूल पेटतेय, असेही मोदींनी म्हटले. 

केंद्र सरकारकडून लॉकडाऊन काळात 30 कोटी जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचीही सुरुवात करण्यात आली आहे. देशातील 80 टक्के नागरिकांना मोफत धान्य देण्याचं कामही सरकारने केलं असून कोरोनाबाबत अद्यापही काळजी घेण्याचे आवाहनही मोदींनी नागरिकांना केले आहे. 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहांनी मोदींच्या भाषणापूर्वी, महत्त्वपूर्ण, आज संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना उद्देशून होणारे संबोधन जरूर ऐका, असे आवाहन केले होते. त्यामुळे देशावासियांना मोदींच्या भाषणाची आतुरता होती. ट्विटच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी IMPORTANT शब्दाचा उल्लेख केला होता. त्यामुळे, आजच्या भाषणाबद्दल कमालीची उत्सुकताही होती. त्यानुसार, मोदींनी 4 वाजता देशवासियांशी संवाद साधला. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prime Minister Modi's big announcement, the poor will get free food for another 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.