कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 10:53 IST2025-10-13T10:46:56+5:302025-10-13T10:53:31+5:30
कर्नाटकात आरएसएसवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आरोप केला आहे.

कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला १०० वा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन देशभर साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला आणि RSS च्या सन्मानार्थ एक टपाल तिकिट आणि नाणे जारी केले. तर दुसरीकडे कर्नाटकात आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खासदार मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आणि देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करण्यासाठी तरुणांना आणि मुलांना भडकवण्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, आता कर्नाटक सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी या पत्राची दखल घेतली आहे. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना संपूर्ण प्रकरण समजून घेण्यास आणि त्याबद्दल माहिती गोळा केल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटक सरकारमध्ये प्रियांक खरगे हे आयटी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रियांक खरगे यांच्या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध व्यक्त केला आहे. 'सरकार आपल्या अपयशांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी एक नवीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याशिवाय, मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष हे देखील यासाठी एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी विधानसभेत आरएसएसच्या प्रार्थनेच्या दोन ओळी वाचल्या होत्या आणि त्यांचे कौतुक केले होते.
प्रियांक खरगे यांनी आपल्या पत्रात आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, यामध्ये शाखा आणि बैठकांवर बंदी घालण्याचा समावेश आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. "सरकारी शाळा, अनुदानित शाळा आणि क्रीडांगणांमध्ये शाखांना परवानगी देऊ नये', असंही खरगे म्हणाले. खरगे यांनी सरकारी मालकीच्या मंदिरांच्या वापरावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. 'आरएसएस आपल्या कार्यांद्वारे द्वेषाचे बीज पेरत आहे. आरएसएसचे कार्यकर्ते पोलिसांच्या परवानगीशिवाय काठ्या घेऊन जातात',असा आरोप खरगे यांनी केला आहे.
काँग्रेसला आरएसएसची लोकप्रियता पचवता येत नाही
दरम्यान, यावर भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. "काँग्रेस पक्षाला आरएसएसची वाढती लोकप्रियता पचवता येत नाही. ते आता असहिष्णु झाले आहे. देशभरात अशी कोणतीही घटना घडलेली नाही जिथे आरएसएस सदस्यांनी अनुशासनहीनता दाखवली आहे. काँग्रेस दीर्घकाळापासून आरएसएसला विरोध करत असली तरी, आरएसएसची स्वतःची भूमिका आहे आणि ती नेहमीच देशाचे रक्षण करण्यास तयार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले.