Delhi Pollution : प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 08:48 IST2019-11-17T08:45:51+5:302019-11-17T08:48:16+5:30
दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे.

Delhi Pollution : प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक
नवी दिल्ली - दिल्लीतीलप्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.
दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. मात्र आता या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
Delhi: Major pollutants PM 2.5 at 218 & PM 10 at 217, both in 'poor' category in Lodhi Road area, according to the Air Quality Index (AQI) data. pic.twitter.com/8QWrCXrOm0
— ANI (@ANI) November 17, 2019
दिल्लीच्या वातावरणात शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदूषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदूषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी दिल्लीकरांना मास्क वाटण्यात आले आहेत.
दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध
इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले.
Noida: Air Quality Index (AQI) at 221 (poor) in Sector-62 area, as per Central Pollution Control Board (CPCB) data. pic.twitter.com/i4cJbeAGsH
— ANI UP (@ANINewsUP) November 17, 2019
प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट
परदेशातून अनेक पर्यटक हे शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाने दिली आहे. दिल्ली पर्यटन विभागातर्फे राजधानीत चालवण्यात येणाऱ्या होप ऑन होप ऑफच्या सेवेचा वापर करणाऱ्या पर्यटकांची संख्याही घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वायू प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होईल अशी भीती पर्यटकांमध्ये निर्माण झाली आहे. आधी बुकिंग केलेल्या अनेक पर्यटकांनी पर्यटनासाठी येण्याच्या पुढे ढकललेल्या आहेत तर काहींनी त्या रद्द केल्या आहेत. तसेच अनेक पर्यटक फोन करून वातावरण बदलाची चौकशी देखील करत आहेत.