नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 06:26 IST2025-05-23T06:24:06+5:302025-05-23T06:26:18+5:30
‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला.

नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
जितेंद्र प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, बिकानेर: ‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. माझ्या नसानसांत आता रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहते आहे. भारतावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल, असेही त्यांनी बजावले. पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.
राजस्थानमधील पहिल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भारताने बदला घेण्यासाठी नव्हे तर न्याय मिळविण्यासाठीचा नवा मार्ग म्हणून ऑपरेशन सिंदूरची कारवाई केली. भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही. पाकिस्तानला भारताच्या हक्काच्या पाण्याचा वाटा मिळणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
मैं देश नहीं मिटने दूंगा, मोदींनी घेतली होती शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्यानंतर “सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा” – अशी शपथ मी घेतली. या मोदीचे मन शांत आहे; पण त्याच्या नसांतून वाहणारे रक्त मात्र गरम आहे. मी माँ भारतीचा सेवक आहे, असेही ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मोदींनी भारतीय सैन्य दलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारने तिन्ही सैन्यदलांना स्वातंत्र्य दिले. त्यांनी एकत्र येऊन असा सापळा रचला की पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावेच लागले.
केंद्र सरकारने तडजोड केली : राहुल गांधी
भारताची प्रतिष्ठा, सन्मानाशी केंद्राने तडजोड केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. पाकविरुद्धची लष्करी कारवाई थांबविण्याचा निर्णय घेऊन सरकारने देशहिताशी गद्दारी केली अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, सरकारमधील प्रमुखांनी पोकळ भाषणे थांबवावीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकून भारताच्या हितालाच बाधा का आणली? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.