Operation Sindoor, PM Modi Planning: काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप हिंदूंची हत्या केली. या हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान ताबडतोब देशात परतले. यासंदर्भात आता एक बाब सूत्रांच्या हवाल्याने उघड झाली आहे की, पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये असतानाच प्लॅन आखला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियामध्येच पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करेल असा निर्णय पंतप्रधानांनी सौदी अरेबियातच घेतला होता. सूत्रांनी म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी आधीच ठरवले होते की यावेळी काहीतरी मोठा धमाका केला जायला हवा जेणेकरून पाकिस्तान आणि जगालाही स्पष्ट संदेश दिला जाईल.
४५ हून अधिक गुप्त बैठका
मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यापूर्वी ४५ हून अधिक गुप्त बैठका झाल्या. त्यात NSA, CDS आणि सैन्यदलाचे तिन्ही प्रमुख, IB आणि RAW प्रमुख सहभागी होते. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांपेक्षा हे वेगळे होते. या बैठका एका गुप्त ठिकाणी झाल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी एक वॉर रूम उभारण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरचे रिअल टाइम मॉनिटरिंग तेथूनच केले जात होते. पंतप्रधानांना प्रत्येक क्षणी माहिती दिली जात होती. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतो अशी माहिती गुप्तचर संस्थांना आधीच मिळाली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई तळांनाही लक्ष्य करण्यात आले आणि एक कडक संदेश दिला गेला.
भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी
६-७ मे च्या रात्री पाकिस्तानला मोठा दणका बसला. संपूर्ण जगाने पाहिले की भारत पाकिस्तानच्या नापाक कारस्थानांविरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध गप्प बसणार नाही. आपल्या पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर देईल. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला, पण भारत सक्षम राहिला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या शैलीचे कौतुक करण्यात आले.