इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:27 IST2025-12-06T10:23:56+5:302025-12-06T10:27:19+5:30
नागरी विमान वाहतूक देखरेख संस्थेने शुक्रवारी इंडिगोला काही सवलती देऊन तिचे कामकाज पूर्ववत करण्यास मदत केली होती, परंतु सलग चौथ्या दिवशीही एअरलाइनच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
इंडिगो एअरलाइनच्या हवाई वाहतूक संकटावर आता सर्वोच्च न्यायालयाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर त्वरित सुनावणी व्हावी, अशी मागणी होत असताना, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी या मागणीची दखल घेतली आहे. त्यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलांना आजच आपल्या निवासस्थानी बोलावले आहे. इंडिगोच्याविमानांची उड्डाणे मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या प्रचंड त्रासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेत प्रवाशांना मोठा त्रास आणि मानवी संकट निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याचे वकील सरन्यायाधीशांच्या घरी पोहोचणार आहेत. आजच एक विशेष खंडपीठ स्थापन केले जावे आणि या प्रकरणावर सुनावणी सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
नागरी विमान वाहतूक देखरेख संस्थेने शुक्रवारी इंडिगोला काही सवलती देऊन तिचे कामकाज पूर्ववत करण्यास मदत केली होती, परंतु सलग चौथ्या दिवशीही एअरलाइनच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. शुक्रवारी इंडिगोने एक हजारहून अधिक विमाने रद्द केली, ज्यामुळे प्रवाशांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले. याचा परिणाम म्हणून इतर विमान कंपन्यांनी तिकीट दर वाढवले असून, रेल्वेमध्येही अचानक गर्दी वाढली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय आदेश देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डीजीसीएने इंडिगोच्या मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द होण्याच्या कारणांची विस्तृत समीक्षा आणि मूल्यमापन करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
अनुच्छेद २१चे उल्लंघन आणि भरपाईची मागणी
याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, विमाने रद्द होण्याचे कारण पायलटसाठी असलेल्या नवीन FDTL नियमांचे चुकीचे नियोजन हे आहे. याचिकेत याला प्रवाशांच्या 'अनुच्छेद २१' (जगण्याचा हक्क) मधील अधिकारांचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच, बाधित प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था आणि नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
विशेष रेल्वे आणि विमानांनी दिलासा
या संकटावर मात करण्यासाठी स्पाईसजेट एअरलाइनने १०० अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, रेल्वेनेही अनेक विशेष गाड्या चालवण्याचे आणि ३७ गाड्यांना ११६ अतिरिक्त डबे जोडण्याचे निश्चित केले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय २४ तास नियंत्रण कक्षातून उड्डाणांचे कामकाज, अपडेट्स आणि विमान तिकीटांच्या दरांवर लक्ष ठेवून आहे.