"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:13 IST2025-12-01T14:12:04+5:302025-12-01T14:13:11+5:30
यावेळी, खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दरम्यान त्यांनी सभापती राधाकृष्णन यांनाही खास सल्ला दिला.

"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
आज सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालेल. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक कोपरख्या बघायला मिळाल्या. सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले. तसेच काँग्रेसाध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांचे स्वागत केले. यावेळी, खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दरम्यान त्यांनी सभापती राधाकृष्णन यांनाही खास सल्ला दिला.
सभापती सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "मला आशा आहे की, आपण दोन्ही बाजूंना समान न्याय द्याल. आपण आपल्या आसनावरून त्या बाजूला (सत्तापक्ष) फार बघू नका, इकडे धोका आहे आणि इकडे (विरोधक) बघितले नाही, तरी धोका आहे. यामुळे तुम्ही दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखल्यास बरे होईल."
यावेळी खर्गे यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "त्यांना (धनखड) निरोप समारंभाची संधी न मिळाल्याबद्दल दुःख वाटते. पण त्यांची प्रकृती बरी असेल, असी आशा आहे." त्यांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोध केला. ''खर्गे यांनी एक उल्लेख केला, हे योग्य केले नाही.''
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य करत, संसद हे निवडणुकीतील पराभवानंतरची 'नाराजी' व्यक्त करण्याचे व्यासपीठ बनू नये, असे म्हणाले. यावर पलटवार करत खर्गे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी मुख्य मुद्द्यांवर बोलण्याऐवजी पुन्हा एकदा 'ड्रामेबाजी' केली. भाजपने आता दिशाभूल करण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांवर संसदेत चर्चा करावी.