'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:06 IST2025-07-28T15:05:28+5:302025-07-28T15:06:00+5:30
'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही; पाकिस्तानने कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तर त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.'

'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
Parliament Monsoon Session 2025 : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सरकारची बाजू मांडली आणि विरोधकांचे सर्व आरोप आणि टीका खोडून काढल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे नाही, तर पाकिस्तानच्या विनंतीमुळे युद्धविराम मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, भारतीय सैन्याचे किती विमान पाडले? या विरोधकांच्या प्रश्नालाही राजनाथ सिंह यांनी सडेतोड उत्तर दिले.
राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात एक अमानवी आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह आपल्या २५ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून मारले, हे अमानुषतेचे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही घटना भारताच्या सहनशीलतेची मर्यादा होती. त्यामुळेच आम्ही ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला एक कडक संदेश दिला. हे ऑपरेशन अजून संपलेले नाही. यापुढे पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचे कट रचले गेले, तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल आणि पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.
भारताची किती विमान पाडली?
राजनाथ सिंह पुढे म्हणतात, विरोधी पक्ष विचारत आहेत की, पाकिस्तानी सैन्याने आपली किती विमाने पाडली? हा प्रश्न जनतेच्या भावनांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही. त्यांनी आम्हाला कधीही हे विचारले नाही की, आपल्या सैन्याने शत्रूची किती विमाने पाडली? जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का? हे विचारावे. याचे तर उत्तर हो, असे आहे. जेव्हा ध्येय मोठी असतात, तेव्हा लहान मुद्द्यांकडे लक्ष वळवू नये. जर विरोधी पक्षाचे मित्र ऑपरेशन सिंदूरवर योग्य प्रश्न विचारू शकत नसतील, तर त्याला मी काही करू शकत नाही.
RM Shri @rajnathsingh speaks on special discussion on India's strong, successful and decisive #OperationSindoor in Lok Sabha. https://t.co/GvO0j3p0LD
— BJP (@BJP4India) July 28, 2025
मी चार दशकांहून अधिक काळापासून राजकारणात आहे. मी कधीही राजकारणाकडे प्रतिकूल दृष्टिकोनातून पाहिले नाही. आज आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत, पण कायम राहणार नाही. जेव्हा जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी सोपवली होती, तेव्हा आम्ही ती सकारात्मक पद्धतीने पार पाडली. १९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धाचा दुःखद परिणाम झाला, तेव्हा आम्ही विचारले होते की, आपली जमीन दुसऱ्या देशाने कशी ताब्यात घेतली. लष्कराचे जवान कसे मारले गेले. आम्ही युद्धसामग्री आणि बंदुकांची चिंता नव्हती, तर देशाच्या कल्याणाची काळजी होती. १९७१ मध्ये जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवला, तेव्हा आम्ही राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक केले. अटलबिहारी वाजपेयी संसदेत उभे राहून त्यावेळच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. तेव्हाही आम्ही सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले नाही. अधिक व्यावहारिक भाषेत सांगायचे तर, परीक्षेचा निकाल महत्त्वाचा असतो. परीक्षेदरम्यान पेन्सिल तुटली, पेन संपला, हे महत्वाचे नसते. आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान निश्चित केलेले लक्ष्य पूर्णपणे साध्य केले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले.
भारताने कारवाई का थांबवली ?
भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवले, कारण आम्ही ठरवलेले सर्व लक्ष्य साध्य केले होते. कोणत्याही दबावाखाली भारताने ही कारवाई थांबवली, असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा उद्देश पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे वाढलेल्या दहशतवादी नर्सरी नष्ट करणे हा होता. आमच्या सैन्याने फक्त त्यांनाच लक्ष्य केले. या कारवाईचा उद्देश युद्ध करणे नव्हता. १० मे रोजी सकाळी जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई तळावर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने पराभव स्वीकारला. पाकिस्तानने आपल्या डीजीएमओशी बोलून युद्ध थांबवण्याची विनवणी केली, त्यामुळेच आम्ही कारवाई थांबवली, असेही त्यांनी स्पष्ट केले.