जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने रात्रभर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली. पाकिस्तान सीमेवर नागरिकांना लक्ष्य केले गेले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. हे नागरिक सध्या सांबा येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित आहेत. सांबा येथे पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या स्थानिकांसाठी उभारलेल्या छावणीची ओमर अब्दुल्ला यांनी पाहणीही केली. यानंतर बोलताना अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, "सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ड्रोनचा वापर केला आहे, पण पाकिस्तानचे सर्व ड्रोन आपण पाडले. त्याचे श्रेय आपल्या संरक्षण दलांना जाते. काश्मीरमधील अनंतनाग येथील एका दारूगोळा डेपोलाही लक्ष्य करण्यात आले होते, परंतु तो प्रयत्नही आपण हाणून पाडण्यात आला. हा संघर्ष आपण सुरू केलेला नाही. पहलगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले आणि आपल्याला त्याचे प्रत्युत्तर द्यावे लागले. आपण प्रतिहल्ला केल्यानंतर गोष्टी थांबायला हव्या होत्या. पण पाकिस्तान परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा त्यांना कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. त्यांनी जरा अक्कल वापरावी आणि त्यांच्या बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. ताण वाढवण्याऐवजी त्यांनी तो कमी करण्याचा दृष्टीने विचार आणि आचरण करावे."
पूंछमध्ये मोठे नुकसान- मुख्यमंत्री अब्दुल्ला
"पूंछमध्ये मोठे नुकसान झाले आहे. पुंछमध्ये बळी आणि जखमींची संख्या सर्वाधिक आहे. मी काही काळ जम्मूच्या रुग्णालयात होतो आणि तिथे दाखल झालेले सर्व जखमी पुंछचे आहेत. पूंछमध्ये परिस्थिती गंभीर आहे. उपमुख्यमंत्री पुंछला पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, जर ते तिथे पोहोचले तर ते तिथल्या लोकांना भेटतील. आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. दिवसातून तीन वेळा जेवण दिले जात आहे, स्वच्छता सुविधा उपलब्ध आहेत, सर्व छावण्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. येथे राहताना त्यांना शक्य तितक्या कमी समस्यांना तोंड द्यावे लागेल याची आम्ही खात्री करत आहोत," अशी माहिती अब्दुल्ला यांनी दिली.