Odisha School Food Poisoning: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका सरकारी शाळेत १०० हून अधिक विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली विद्यार्थिनी पाचवीत शिकत होती. खराब जेवणामुळे झालेल्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकबंध आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी जेवण केल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. हे जेवण अधिकृत मेनूचा भाग नव्हतं. पालकांनी दावा केला आहे की, मुलांना आंबवलेले तांदूळ, कुस्करलेले बटाटे आणि आंब्याची चटणी देण्यात आली होती, त्यानंतर अनेक मुलांना उलट्या आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. बाधित १०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुरुवातीला जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. त्यापैकी ६७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बारीपाडा येथील पंडित रघुनाथ मुर्मू (PRM) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.
मुलांवर उपचार सुरू
इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी रूपाली बेसरा हिला सोमवारी अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलं होतं, मात्र वैद्यकीय प्रयत्नांनंतरही मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. इतर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून रुग्णालय आणि शाळा दोन्ही ठिकाणी वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मयूरभंजचे जिल्हाधिकारी हेमा कांता साय यांनी सांगितलं की, ६६ विद्यार्थ्यांवर अद्याप मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर ४१ जण सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी विद्यार्थिनीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला असून मध्य विभागाच्या महसूल विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांचा लाठीचार्ज आणि गावकऱ्यांचा संताप
विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे लोक संतप्त झाले. जेव्हा पोलीस विद्यार्थिनीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तिच्या गावात घेऊन पोहोचले, तेव्हा परिस्थिती अधिक बिघडली. न्याय आणि अधिक नुकसान भरपाईची मागणी करत संतप्त गावकऱ्यांनी अंत्ययात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
Web Summary : A student died and over 100 fell ill in Odisha after suspected food poisoning at a government school. Villagers protested, leading to a police response. An investigation is underway, and medical teams are providing treatment to affected students.
Web Summary : ओडिशा के एक सरकारी स्कूल में भोजन विषाक्तता के कारण एक छात्रा की मौत हो गई और 100 से अधिक छात्र बीमार पड़ गए। ग्रामीणों ने विरोध किया, जिसके कारण पुलिस कार्रवाई हुई। मामले की जांच जारी है और प्रभावित छात्रों का इलाज किया जा रहा है।