“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:49 IST2025-11-24T19:46:46+5:302025-11-24T19:49:37+5:30
Bihar Politics News: बिहार हे लोकशाही सतत क्षीण होत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. नितीश कुमार आता फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.

“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
Bihar Politics News: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिहार सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. नवीन मंत्रिमंडळातील महत्त्वाचे गृह खाते उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. २० वर्षांत नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच गृहखाते सोडले. यानंतर आता एनडीएवर विरोधकांनी टीका केली असून, पुढे भाजपावाले नितीश कुमार यांच्याकडून मुख्यमंत्रीपदही काढून घेतील, असा दावा करण्यात आला आहे.
बिहारमध्ये भाजपाने लोकशाही नष्ट केली. भाजपा निवडणुकीत हेराफेरी करत आहे. डॉ. बाबासाहेर आंबेडकरांनी लोकशाही निर्माण केली आणि आज भाजपा मते चोरत आहे. ५ किलो धान्य देऊन मते चोरत आहेत. गरिबांना मोफत रेशन देणे ही लोकशाही नाही तर मत खरेदीचे राजकारण आहे. गरिबांना आदर मिळायला हवा; फक्त धान्य देऊन मते मिळवणे हा लोकशाही मूल्यांचा अपमान आहे, अशी टीका व्हिआयपी नेते मुकेश साहनी यांनी केली.
पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील
बिहार हे लोकशाही सतत क्षीण होत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. भाजपाने हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा पाया रचला. नितीश कुमार आता फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत, कारण गृहखाते आता भाजपाकडे गेले आहे, त्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे. आता नितीश कुमार यांच्याकडून गृहखाते काढून घेण्यात आले आहे. लवकरच, भाजपा मुख्यमंत्रीपदही काढून घेईल, असा मोठा दावा साहनी यांनी केला.
दरम्यान, नितीश कुमार मंत्रिमंडळात एकूण २४ मंत्र्यांनी शपथ घेतली, पण केवळ १८ जणांनाच खातेवाटप करण्यात आले आहे. उर्वरित मंत्र्यांचे खाते अद्याप निश्चित झालेले नाही, या विषयावर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रामकृपाल यादव यांना कृषी खाते देण्यात आले आहे, ते सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक मानले जातात.