"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:22 IST2024-12-18T13:20:55+5:302024-12-18T13:22:55+5:30
Amit Shah Video Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसने टीका केली. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी उत्तर दिले.

"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ
"आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर म्हणण्याची आता एक फॅशन झाली आहे. इतकं नाव ईश्वराचं घेतलं असतं, तर सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता", असे विधान करतानाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले. अमित शाहांनी आंबेडकरांचा अवमान केल्याचे म्हणत काँग्रेस आणि विरोधकांनी संसदेत आणि विधिमंडळातही निषेध केला. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपाला आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उत्तर दिले. तावडे यांनी काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ आणि पूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या विधानाचे पडसाद उमटले. विरोधकांनी संसदेत आणि विधिमंडळात निषेध केला. भाजपला आंबेडकरविरोधी ठरवत विरोधकांनी हल्ला चढवला. विरोधकांच्या टीकेला तावडे यांनी अमित शाह यांच्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ शेअर करत उत्तर दिले आहे.
विनोद तावडेंनी काँग्रेसला काय उत्तर दिले?
काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ आणि विधानाचा पूर्ण व्हिडीओ शेअर करत विनोद तावडे म्हणाले, "काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर विरोधी पक्ष राहिला आहे आणि आता गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडीओ काटछाट करून भ्रम पसरवण्याचे प्रयत्न करत आहे."
"इतिहास साक्षी आहे की काँग्रेसच्या धोरणांमुळे नाराज होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेस सुरूवातीपासूनच बाबासाहेबांचा विरोध करत राहिली आहे आणि आता फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे", असे प्रत्युत्तर विनोद तावडे यांनी काँग्रेसला दिले.
कांग्रेस बाबा साहब भीमराव अंबेडकर जी की धुर विरोधी पार्टी है और अब गृहमंत्री @AmitShah जी के वीडियो को काटकर भ्रम फैलाने की कोशिश कर रही है।
— Vinod Tawde (@TawdeVinod) December 18, 2024
इतिहास गवाह है कि कांग्रेस पार्टी की नीतियों से नाराज होकर बाबा साहब ने केंद्रीय कैबिनेट से इस्तीफा दे दिया था। इसके बावजूद भी तत्कालीन… pic.twitter.com/Nhmxb5hBxo
अमित शाहांनी देशाची माफी मागायला हवी, काँग्रेसची मागणी
राज्यसभेत उत्तर देताना अमित शाह यांनी केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. काँग्रेसने शाहांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, "अमित शाह खूप वाईट बोलले आहेत. त्यातून हे दिसते की, भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप द्वेष आहे."
"इतका द्वेष की त्यांच्या नावाचाही यांना राग येतो. हे तेच लोक आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळले आहेत. जे स्वतः बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची गोष्ट करतात. जेव्हा जनतेने यांना धडा शिकवला, तर यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याबद्दल राग येत आहे. लाजिरवाणं आहे. अमित शाहांनी यासाठी देशाची माफी मागायला हवी", असे काँग्रेसने म्हटले.