काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:37 IST2026-01-09T13:33:21+5:302026-01-09T13:37:05+5:30
ज्या घरात काही महिन्यांनंतर सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि लग्नाची लगबग सुरू होती, तिथे अचानक शोककळा पसरली आहे

फोटो - tv9hindi
नोएडातील ज्या घरात काही महिन्यांनंतर सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि लग्नाची लगबग सुरू होती, तिथे अचानक शोककळा पसरली आहे. नोएडाच्या नयाबांस गावातील एक होतकरू तरुण, जो डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन नेपाळला गेला होता, त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या आणि तो डॉक्टर बनल्याच्या आनंदात असलेलं कुटुंब आता त्याच्या पार्थिवाला खांदा देत आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नयाबांस येथील रहिवासी असलेला 'प्रिन्स' नेपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि तो नेपाळमधील एका रुग्णालयात इंटर्नशिप करत होता. आपला मुलगा लवकरच डॉक्टर होऊन ग्रेटर नोएडाला परतेल आणि कुटुंबाचा आधार बनेल, याचा कुटुंबाला सार्थ अभिमान आणि आनंद होता.
भीषण अपघाताने हिरावलं आयुष्य
कुटुंबाच्या आनंदावर विरजण तेव्हा पडले, जेव्हा नेपाळमध्ये एका अपघातात प्रिन्स गंभीर जखमी झाला. रुग्णालयातून बाहेर पडत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला मागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नेपाळहून आणला मृतदेह
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक नेपाळला पोहोचले आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह भारतात आणण्यात आला. मुलाचे पार्थिव गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शेकडो लोकांनी कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली होती. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१० मार्चला होणार होतं लग्न
नातेवाईकांनी सांगितलं की, प्रिन्सचं लग्न १० मार्च रोजी ठरलं होतं. घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. कपडे आणि दागिन्यांची खरेदी सुरू होती. मुलाचं शिक्षण पूर्ण होणं आणि त्याचं लग्न या दोन्ही गोष्टींमुळे कुटुंब खूप उत्साहात होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्या मुलासाठी लग्नाच्या पत्रिका छापल्या जाणार होत्या, त्याची अंत्ययात्रा काढावी लागली. प्रिन्स अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू होता.