‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:27 IST2025-07-30T06:25:32+5:302025-07-30T06:27:39+5:30
राहुल गांधींचा सवाल: ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे पंतप्रधान सभागृहात का सांगत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर: पाकव्याप्त काश्मीर गमावला कुणी? याचे उत्तर आधी द्या.

‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता दिले. 'मी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केली, असे ट्रम्प यांनी आतापर्यंत २६ वेळा म्हटले आहे. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे आव्हान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावर पंतप्रधानांनी हे उत्तर दिले.
लोकसभेत १६ तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर देताना आपल्या १ तास ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला पाकिस्तानविरुद्ध कारवाई थांबवण्यास सांगितले नव्हते.
पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला हल्ला थांबवण्याची विनंती केली होती, कारण ते आमच्या हल्ल्याला तोंड देऊ शकले नाहीत. ऑपरेशन सिंदूर व अन्य गोष्टींसंदर्भात काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी माझ्यावर टीका केली. त्यांनी भारतीय जवानांच्या पराक्रमाचे कौतुक केले नाही, त्यांना पाठिंबा दिला नाही. ऑपरेशन सिंदूरबद्दल काँग्रेस आपल्या शूर जवानांचे मनोधैर्य खच्ची होईल, अशी वक्तव्ये करत आहे.
संपूर्ण जग भारताच्या बाजूने; पण काँग्रेसने जवानांच्या शौर्याची पाठराखण केली नाही
पाकव्याप्त काश्मीर अद्याप परत का घेतले नाही, असा प्रश्न विचारण्याआधी काँग्रेसने हा प्रदेश गमावला कुणी, याचे प्रथम उत्तर द्यावे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून काँग्रेसने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या वेदना भारत आजही सहन करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत सुरू असलेल्या विशेष चर्चेच्या दुसऱ्या दिवशी या सभागृहात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभं राहिलं; पण काँग्रेस आणि तिच्या घटक पक्षांना मात्र आपल्या जवानांच्या शौर्याची पाठराखण करता आली नाही.
मोदी म्हणाले की, केंद्रात यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या चालून आलेल्या संधी गमावल्या. त्यावेळी भारताकडे पाकिस्तानच्या भूभागासह त्याचे सैनिकही ताब्यात होते. पाकिस्तानातून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांचा रस्ताच भारताने आता बंद केला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणण्यात आले. काँग्रेस इतका हताश आहे की सोमवारच्या ऑपरेशन महादेवच्या वेळेबाबतही प्रश्न उपस्थित केले.
ऑपरेशन सिंदूरबाबत संवेदनशील माहिती सरकारने पाकला दिली : राहुल गांधी
ऑपरेशन सिंदूरबाबत संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी विशेष चर्चेत दुसऱ्या दिवशी बोलताना केला. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर मध्यरात्रीनंतर एक वाजून ५ मिनिटांनी सुरू झाले. १ वाजून ३५ मिनिटांनी भारताने पाकिस्तानशी संपर्क साधून सांगितले की, आम्ही तुमच्या बिनलष्करी ठिकाणांवर हल्ला केला असून आम्हाला संघर्ष वाढविण्याची इच्छा नाही. ही माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेतील आपल्या भाषणात दिली, असे राहुल यांनी निदर्शनास आणून दिले.
भारतीय संरक्षण दलांना पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे नाही. केंद्र सरकारने लष्कराचे मनोबल व कार्यक्षमता या गोष्टींवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर तीन मिनिटांत केंद्र सरकारने भारतीय सैन्य संचालन महासंचालक (डीजीएमओ) यांना शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानशी संपर्क साधण्याचे आदेश दिले. पाकिस्तानवर हल्ला करायचा, त्याचवेळी त्याला हेही सांगायचे की आम्ही तुमच्या लष्करावर किंवा हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला करणार नाही. याचा अर्थ असा की, केंद्र सरकारने लष्कराला स्वातंत्र्य दिले नाही.
ते पहलगामचे हल्लेखोरच : पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी डाचिगाममध्ये दडून बसले असल्याची आयबीला मिळाली होती. खात्री २२ जुलै रोजी झाली. त्यानंतर ऑपरेशन महादेव पार पडल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
युद्ध का थांबवले ते सांगा : गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानविरोधातील युद्ध केंद्र सरकारने का थांबविले याचे कारण सांगितले नाही. एकही विमान पाडण्यात आले नसेल तर तसे संसदेत सांगण्यात अडचण काय? असा सवाल खा प्रियांका गांधी यांनी केला.
ऑपरेशन सिंदूर थांबवावे, अशी विनंती पाकिस्तानच्या लष्कराने भारताकडे केली. त्यानंतर अटीवरच पाकिस्तानची विनंती मान्य केली, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले.
कलम ३७० हटवताना सरकार म्हणाले होते की, तेथे आता दहशतवादी हल्ला होणार नाही. मग पहलगामची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी केला.