गुजरातमधील निसटत्या विजयानंतर मोदींनी टोचले गुजराती नेत्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 02:01 PM2017-12-19T14:01:13+5:302017-12-19T14:05:01+5:30

गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

Narendra Modi's ears of tired Gujarati leaders after Gujarat's survival victory | गुजरातमधील निसटत्या विजयानंतर मोदींनी टोचले गुजराती नेत्यांचे कान

गुजरातमधील निसटत्या विजयानंतर मोदींनी टोचले गुजराती नेत्यांचे कान

Next

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवताना भाजपाची दमछाक झाली होती. काँग्रेसची कडवी झुंज मोडीत काढत भाजपाने अखेर 99 जागांसह कसेबसे बहुमत मिळवत नामुष्की टाळली होती. मात्र गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विजयाचा जल्लोष करताना, आत्मपरीक्षणही करा, ही जागं होण्याची वेळ आहे. अशा कडक शब्दात मोदींनी भाजपाच्या गुजरातमधील स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली आहे.

गुजरातमधील मतमोजणीदरम्यान काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी टक्कर सुरू असताना दुपारच्या सुमारास हा मेसेज गुजराती नेत्यांच्या मोबाईलवर आला. या मेसेजनंतर मात्र ढोलताशे घेऊन भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी सज्ज झालेल्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गुजरातमध्ये सरकारविरोधी वातावरण असतानाही सत्ता राखण्यात भाजपाला यश मिळाले. पण काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 80 जागा पटकावल्याने मोदी अस्वस्थ झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी गुजराती नेत्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिल्याची चर्चा आहे.

भाजपाने 2012 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 115 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी पक्षाच्या जागांमध्ये 15 जागांची घट झाली आहे. त्यातही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी जोर लावला नसता तर गुजरात भाजपाच्या हातून निसटले असते असे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले होते. मोदींनी गुजरात जिंकवून दिले असले तरी काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरल्याचे चित्र दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.

गुजरात या मोदी यांच्या बालेकिल्ल्यावरच राहुल गांधी यांनी घाव घातला. दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी आवाज उठवला. सोशल मीडियावर मोदी व अमित शहा यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीही केली. विकासाच्या मुद्द्यावर बोलतीच बंद केली. यामुळेच भाजपा शंभरीही गाठू शकली नाही. काल लागलेल्या निकालांमध्ये गुजरात आणि हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले असले तरी गुजरातमध्ये काँग्रेसने केलेली दमछाक बघता पुढील वर्षी आठ राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांमध्ये भाजपाला कसरत करावी लागेल.

Web Title: Narendra Modi's ears of tired Gujarati leaders after Gujarat's survival victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.