औरंगाबादचे नामकरण दाराशुकोह करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 21:30 IST
सदानंद मोरे यांची सूचना : इतिहास पुसण्याची घटना घडल्या आहेतच
औरंगाबादचे नामकरण दाराशुकोह करा
सदानंद मोरे यांची सूचना : इतिहास पुसण्याची घटना घडल्या आहेतचपुणे : ज्या राजवटीत समाजाची अवहेलना, दुसर्या समाजावर अतिक्रमण झाले आहे, त्या राजवटीच्या खुणा, इतिहास पुसण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या काही नवीन नाहीत. औरंगजेब मोठा बादशहा होता, पण त्याच्या राजवटीत मुस्लिमांना फायदा झाला असे नाही. औरंगाबादचे नामकरण करताना धार्मिक तेढ निर्माण होऊ द्यायची नसेल तर सर्व धर्मांच्या साहित्याचा अभ्यास करणारा, औरंगजेबाचा भाऊ दाराशुकोहचे नाव द्यावे, अशी सूचना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केली आहे.दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ औरंगाबादचे नाव बदलून त्याचे संभाजीनगर करावे, अशी मागणी पुढे आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसंदर्भात डॉ. मोरे सोमवारी साहित्य परिषदेत आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'ज्या सत्तेकडून धार्मिक, सामाजिक अतिक्रमणे होतात त्या सत्तेचा इतिहास पुसला जाण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. ब्रिटिश काळातील अशाच घटना कालांतराने पुसण्यात आल्या आहेत. दिल्लीतील नामांतराशी धार्मिक संबंध दिसत नाही. औरंगजेब मोठा बादशहा होऊन गेला. त्याच्या राज्यकारभाराचा अनेकांना त्रास झाला. त्याच्या राजवटीचा मुस्लिमांना फायदा झाला असे नाही. मुस्लिमांनाही त्रास झाला. सहिष्णूताशून्य असेच त्या राजाचे वर्णन करावे लागेल.'ते म्हणाले, 'सध्याच्या स्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केल्यास धार्मिकतेचा संशय येईल. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून संभाजीनगरचे नामकरण दाराशुकाहचे नाव द्यावे. दाराशुकोह हा धार्मिक होता. अनेक धर्मग्रंथांचा त्याचा अभ्यास होता. औरंगजेबाने त्याची हत्या करून त्याचे शिर वडिलांना भेट दिले होते. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पत्रातही दाराशुकोहचा उल्लेख आहे. औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात शिवाजीमहाराजांनी म्हटले आहे, की दाराशुकोह राज्यकारभार करीत असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.०००००