दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 06:16 IST2025-10-13T06:15:13+5:302025-10-13T06:16:59+5:30
...त्यांच्या या सल्ल्यानंतर, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर रविवारी, आपल्या वक्तव्याचा वपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एक विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थिनींना रात्री उशिरा बाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर रविवारी, आपल्या वक्तव्याचा वपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात, अलीपूरद्वारमध्ये पत्रकारांसोबत बोलताना ममता म्हण्याल्या, "डमडम विमानतळावरील माझ्या विधानाचा जाणूनबुजून विपर्यास करण्यात आला. आपण मला प्रश्न विचारता आणि मी उत्तर दिल्यानंतर, ते चुकीच्या पद्धतीने सादर केले जाते. त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. माझ्यासोबत असे घाणेरडे राजकारण करू नका." एवढेचन नाही तर, "इतरांच्या तुलनेत, माझ्यामध्ये तुम्हाला भेटून थेट बोलण्याची शालीनता आहे. बाकीचे तर केवळ आधीपासूनच निर्धारित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात," असेही ममता म्हणाल्या.
यापूर्वी काय म्हणाल्या होत्या ममता? -
रविवारी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, "ही घटना अतिशय भयावह आहे. पण, आता प्रश्न असा पडतो की, घटना घडली, तेव्हा कॉलेज प्रशासन कुठे होते? तरुणी रात्री एवढ्या उशिरा (12:30) बाहेर कशी गेली? ती बाहेर काय करत होती? मुलींनी रात्री बाहेर पडू नये. कॉलेजनेही जबाबदारी घ्यावी लागेल." दरम्यान, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतरांचा तपास सुरू आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या.
नेमकी काय आहे प्रकरण? -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार झाला. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत जेवाणासाठी बाहेर गेली होती. ही विद्यार्थिनी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जलेश्वर येथील होती. ही घटना शुक्रवारी (10 ऑक्टोबर, 2025) च्या रात्री एका खासगी मेडिकल कॉलेज परिसर घडली.