माझं जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित- अमर सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 18:47 IST2018-07-30T18:46:47+5:302018-07-30T18:47:33+5:30
समाजवादी पार्टीचे पूर्वाश्रमीचे नेते अमर सिंह लवकरच भाजपावासी होण्याची शक्यता आहे.

माझं जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित- अमर सिंह
नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे पूर्वाश्रमीचे नेते अमर सिंह लवकरच भाजपावासी होण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. खरं तर अमर सिंह काल लखनऊमधल्या योगी आदित्यनाथांच्या कार्यक्रमात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यामुळे ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाषणामध्ये अमर सिंह यांचा उल्लेख केला होता. ज्या नेत्यांचे उद्योगपतींबरोबर फोटो नाहीत. त्यांनीही उद्योगपतींच्या घरी दंडवत घातले आहेत, अमर सिंहांकडे अशा सर्वांची कुंडली आहे, असंही मोदी म्हणाले होते. त्यानंतरही अनेक कार्यक्रमात अमर सिंह मोदींबरोबर दिसले होते. अमर सिंहांनीही मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ते म्हणाले, आता माझं समाजवादी पार्टीशी काहीही देणं-घेणं नाही. मी माझं जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित केलं आहे. आता मी कुठेही जाणार नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, भाजपा अमर सिंहांचा उपयोग उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी करत आहे. यापूर्वीही अमर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. तसेच भाजपात सहभागी होणार असल्याचे अमर सिंह यांनी स्वतः सूतोवाच केले आहेत. परंतु अद्यापही मला भाजपाकडून तसं कोणतंही आमंत्रण मिळालेलं नाही, असंही अमर सिंहांनी स्पष्ट केलं आहे.