"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:08 IST2025-05-19T13:05:52+5:302025-05-19T13:08:28+5:30
उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी मोठी कारवाई करत मुरादाबाद येथून शहजाद नावाच्या व्यक्तीला आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ...

"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी मोठी कारवाई करत मुरादाबाद येथून शहजाद नावाच्या व्यक्तीला आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीवर पाकिस्तानसाठी संवेदनशील माहिती गोळा करून पाठवल्याचा संशय आहे. सध्या एटीएसकडून त्याची चौकशी सुरू असून, प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.
शहजादची पत्नी रजिया, जी मूळची रामपूर येथील आहे, तिने पतीवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रकारांशी बोलताना रजियाने म्हटले की, "माझा नवरा पाकिस्तानातून सूट आणि कापड आयात करून विकायचा. व्यवसाय थांबल्यावर तो फळांची गाडी लावायचा. त्याच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्याच्यावर अत्याचार केला जात आहे." तिने म्हटले की, शहजाद वर्षातून एक-दोन वेळा पाकिस्तानातील लाहोरला जायचा, तेथून कपडे आणून भारतात विक्री करायचा. त्याचा आयएसआयशी कोणताही संबंध असल्याचे तिने नाकारले आहे.
शहजादचे वारंवार पाकिस्तान दौरे एटीएसच्या रडारवर
उत्तर प्रदेश एटीएसच्या हवाल्यानुसार, शहजादने अनेक वेळा भारत-पाकिस्तान सीमेवर प्रवास केला आहे, आणि हे दौरे संशयास्पद मानले जात आहेत. सध्या त्याच्याशी संबंधित संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून, त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींवरही नजर ठेवली जात आहे.
शहजाद एकटाच पाकिस्तानला जायचा!
शहजाद एकटाच पाकिस्तानला जायचा, त्याच्या सोबत कुणीही नव्हते, असे रजियाने सांगितले. त्याने कधीही कोणालाही सोबत नेले नाही. ती म्हणाली की,"माझ्या नवऱ्याचा आयएसआयशी काहीही संबंध नाही. तो फक्त आपली उपजीविका चालवत होता."
एटीएसकडून सखोल चौकशी
एटीएसने शहजादविरुद्ध गोळा केलेल्या पुराव्यांवर आधारित चौकशी सुरू केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजून काही महत्त्वाचे खुलासे होणे बाकी आहेत, आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांची तसेच पाकिस्तानातील संपर्कांची चौकशी केली जात आहे.