Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला यलो अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:47 IST2025-05-20T12:15:52+5:302025-05-20T15:47:41+5:30
Mumbai Weather Update : भारतीय हवामान खात्याने २१ जूनपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडसह महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. १७ मे ते २१ मे २०२५ दरम्यान विजांच्या गडगडाटासह, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीच्या बुलेटिननुसार, रविवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबईत यलो अलर्ट जारी राहील. तर, २१ जूनपर्यंत राज्यभरात मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार असून, या दरम्यान देखील यलो अलर्ट राहणार आहे.
'या' जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा
तर, ठाणे आणि रायगड सारख्या मुंबई शेजारील जिल्ह्यांमध्ये रविवार ते बुधवारपर्यंत यलो अलर्ट जारी राहील. त्यामुळे, आज मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण प्रदेशाबाहेरही हा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवसांसाठी, उर्वरित महाराष्ट्रातही हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यात पुढील पाच दिवस सतत पाऊस पडेल, गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचे वारे येतील, असे आयएमडीचे शास्त्रज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी म्हटले. मध्य भारतातही अशीच हवामान परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने शनिवारी मुंबईच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली.
मान्सून लवकर हजेरी लावणार!
यंदाचा दक्षिण-पश्चिम मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. २१ ते २२ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागने वर्तवला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व हवामान बदल जाणवू लागले आहेत. राज्यावर उच्च स्तरावरील चक्रीय वाऱ्यांचे परिसंचरण तयार झाले असून त्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. या बदलामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांत पुढील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी विजांसह जोरदार सरी कोसळू शकतात.