मे महिनाभर धो-धो कोसळला! पावसा, जूनमध्ये तरी उसंत घेशील का? IMD चा अंदाज आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:54 IST2025-05-28T10:45:37+5:302025-05-28T10:54:12+5:30
Monsoon June Forecast Update: यंदा मान्सूनने 'सुपरफास्ट लोकल' पकडली होती. यामुळे तो गंतव्य स्थानापर्यंत वेळेपूर्वीच पोहोचला आहे.

मे महिनाभर धो-धो कोसळला! पावसा, जूनमध्ये तरी उसंत घेशील का? IMD चा अंदाज आला...
मे महिन्यात पावसाने कहर केला असून कधी नव्हे तो मे महिना उकाड्यापासून सुसह्य करणारा ठरला आहे. मान्सून त्याच्या नियमित वेळेपेक्षा जवळपास आठवडाभर लवकर आला आहे. सरासरीनुसार आता कुठे केरळच्या वेशीवर असणारा मान्सून या वर्षी पार मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचला आहे. यामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांना पावसाचे हे वागणे नुकसानकारक ठरले आहे. अशातच आता जून महिन्याचा पावसाचा अंदाज आला आहे.
यंदा मान्सूनने 'सुपरफास्ट लोकल' पकडली होती. यामुळे तो गंतव्य स्थानापर्यंत वेळेपूर्वीच पोहोचला आहे. आज थोडी पावसाने उसंत घेतली आहे. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून उन देखील लागत आहे. यामुळे पाऊस आता उसंत घेणार असे वाटत असताना भारतीय हवामान खात्याचे जून महिन्याचे अंदाज आले आहेत.
जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जूनमध्ये सरासरी १६६.९ मिमी पाऊस होतो, यंदा त्यापेक्षा जास्त होणार आहे. म्हणजेच उसंत मिळणार नाही, उनही फार जास्त काळ मिळणार नाही. असे असले तरी भारताच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, वायव्य आणि ईशान्येकडील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा या मुख्य मान्सून क्षेत्रांभोवती सामान्यपेक्षा जास्त १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे वायव्य भारत आणि मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये जूनच्या मध्यापर्यंत मान्सून पोहोचू शकतो.