मोदी करताहेत माझी ‘नक्कल’; मुलायम यांचा दावा

By Admin | Updated: November 24, 2014 02:04 IST2014-11-24T02:04:36+5:302014-11-24T02:04:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी नक्कल करीत असल्याचा दावा समाजवादी पार्टीचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी केला आहे़ गाव दत्तक घेणे

Modi is doing my 'nakal'; Mulayam claims | मोदी करताहेत माझी ‘नक्कल’; मुलायम यांचा दावा

मोदी करताहेत माझी ‘नक्कल’; मुलायम यांचा दावा

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी नक्कल करीत असल्याचा दावा समाजवादी पार्टीचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी केला आहे़ गाव दत्तक घेणे, शौचालय बांधणे या सगळ्या माझ्या योजना आहेत़ मोदींनी माझ्या याच योजनांची ‘कॉपी’ केली आहे, असे मुलायमसिंग यादव म्हणाले़
‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या निमित्ताने मुलायमसिंग यांनी मोदींवर जोरदार ताशेरे ओढले़ ते गाव दत्तक घेण्याच्या बाता करतात़ पण मी १९९० मध्येच गावे दत्तक घेतली होती़ १९९० मध्येच मी सार्वजनिक शौचालय बांधण्यास सुरुवात केली होती़ मोदी सरकार माझीच ‘कॉपी’ करीत आहे़ स्वच्छ भारत घडविण्यासाठी आधी गरिबी हटवावी लागले़ गरिबी हटली की ‘अस्वच्छता’ आपोआप दूर होईल़ पंतप्रधान आत्ता जे बोलत आहेत ते मी करून चुकलो आहे़ तुम्ही सर्वच हे जाणता, असे ते म्हणाले़ पक्षाच्या आमदार व मंत्र्यांना किमान दोन गावे दत्तक घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले़
आपल्याच सरकारचे टोचले कान
मुलायमसिंग रविवारी ३०२ किमी लांबीच्या लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वे चा पायाभरणी समारंभात बोलत होते़ मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही यावेळी हजर होते़ राज्यातील रखडलेल्या विकास योजनांच्या निमित्ताने मुलायमसिंग यांनी यावेळी अखिलेश सरकारला घरचा अहेर दिला़ ढेपाळलेल्या विकास योजनांची गती वाढवून त्या वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत़ कोनशिला सोहळ्यांपेक्षा उद्घाटन सोहळे व्हायला हवेत़ राज्यात विकास योजना अनेक आहेत पण सगळ्या रखडल्या आहेत़ कोनशिला कार्यक्रम होतात पण उद्घाटन होताना मात्र दिसत नाही़ म्हणूनच मला उद्घाटनाची संधी मिळेनाशी झाली आहे़ मी मुख्यमंत्री असताना मी कोनशिला कार्यक्रम नाही तर उद्घाटन कार्यक्रम करायचो़ एखाद्या कोनशिला कार्यक्रमाला गेल्यावर त्याचठिकाणी उद्घाटनाची तारीखही ठरवायचो, असे मुलायमसिंग म्हणाले़
राष्ट्रीय संमेलनात मला पुन्हा पक्षाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे़ मला हटवू इच्छित असाल तर तुम्हाला पुन्हा संमेलन बोलवावे लागेल आणि जोपर्यंत मी आहे, तुम्हाला काम करावेच लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी पक्षातील सत्ताधीशांना दिला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Modi is doing my 'nakal'; Mulayam claims