‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 05:49 IST2025-09-26T05:47:52+5:302025-09-26T05:49:10+5:30
रेल्वेला जोडलेल्या मोबाइल लाँचरवरून मिसाइल झेपावले, डीआरडीओने स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या सहाय्याने मोबाइल लॉन्चरचा उपयोग करीत क्षेपणास्त्र चाचणी केली

‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
नवी दिल्ली : रेल्वेगाडीत बसविलेल्या मोबाइल लाँचरवरून भारताने २,००० किमीपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अशा प्रकारे रेल्वेगाडीचा वापर करून क्षेपणास्त्र चाचणी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. याआधी अशा प्रकारची कृती रशिया, चीन, उत्तर कोरियाने केली आहे.
अग्नी प्राइम क्षेपणास्त्रात स्वतंत्र लाँच क्षमता, अत्याधुनिक प्रणाली आणि सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे. या क्षेपणास्त्राच्या उड्डाणाचा विविध ग्राउंड स्टेशनद्वारे मागोवा घेतला गेला. या चाचणीला डीआरडीओचे शास्त्रज्ञ, एसएफसीचे अधिकारी उपस्थित होते. अग्नी प्राइम क्षेपणास्त्र देशात रेल्वेगाडीतून कोणत्याही भागात नेऊन त्याचा मारा करणे आता भारताला शक्य होणार आहे. मोबाइल लाँचर कोणत्याही अतिरिक्त संसाधनाशिवाय रेल्वेला जोडता येईल. डीआरडीओने स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या सहाय्याने मोबाइल लॉन्चरचा उपयोग करीत क्षेपणास्त्र चाचणी केली
महत्त्व काय?
‘अग्नी-प्राइम’ची रोड-मोबाइल आवृत्ती याआधीच अनेक यशस्वी चाचण्यांनंतर लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाईनंतर साडेचार महिन्यांनी अग्नी प्राइमची चाचणी पार पडली.