दिल्ली-वाराणसी स्लीपर बसला भीषण आग; धावत्या गाडीतून प्रवाशांनी मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:04 IST2025-11-28T15:03:59+5:302025-11-28T15:04:38+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली.

दिल्ली-वाराणसी स्लीपर बसला भीषण आग; धावत्या गाडीतून प्रवाशांनी मारल्या उड्या
UP : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रामादेवी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्ग-19 वर शुक्रवार पहाटे भीषण दुर्घटना घडली. दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या पलक ट्रॅव्हल्सच्या डबल डेकर लक्झरी स्लीपर बसला अचानक आग लागली. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये 30 ते 40 प्रवासी गाढ झोपेत होते.
जीव वाचवण्यासाठी चालत्या बसमधून उड्या मारल्या
आग सर्वप्रथम बसच्या छतावर ठेवलेल्या जड सामानात लागली. त्यामुळे प्रवाशांना काही क्षणांचा अवकाश मिळाला आणि आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून व दरवाज्यातून उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कुठलाही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी बसमध्ये घुसून अनेकांचा जीव वाचवला
रामादेवी चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जळणारी बस पाहताच ते तत्काळ घटनास्थळी धावले. पोलिसांनी जळत्या बसमध्ये थेट प्रवेश करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. सुमारे अर्धा डझन अडकलेल्यांना उचलून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही पाण्याच्या बाटल्या फेकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
ओव्हरलोडिंगचा आरोप
प्रवाशांनी ट्रॅव्हल्स व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. छतावर प्लास्टिकचे पोते, लोखंडी बॉक्स आणि अत्याधिक वजनदार सामान ठासून भरले होते. एका प्रवाशाने सांगितले की, मी रात्री दोन वाजल्यापासून सांगत होतो की, इतकं सामान भरू नका, आग लागली तर? पण कुणी ऐकले नाही. आता माझा लाखोंचा माल जळून खाक झाला आहे. एका महिला प्रवाशाचे लॅपटॉप, 40 हजारांचे कपडे-दागिने सर्व राख झाले.
शॉर्ट सर्किटमुळे आग
घटनेची माहिती मिळताच CFO दीपक शर्मा यांनी सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. महामार्गावर मोठा ट्रॅफिक जाम झाल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत बसचा केवळ सांगाडा उरला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किट हे आगीचे मुख्य कारण आहे.