CoronaVirus News: देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू; आयएमएचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:24 IST2020-07-19T22:23:23+5:302020-07-20T06:24:35+5:30
परिस्थिती बनली आणखी बिकट'

CoronaVirus News: देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू; आयएमएचा दावा
नवी दिल्ली : देशातील रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली असून, आता कोरोनाच्या सामूहिक संसर्गालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) एक विभाग असलेल्या हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडियाचे प्रमुख डॉ. व्ही. के. मोंगा यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, सध्या देशात दररोज कोरोनाचे तीस हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होत असून, ते चांगले चिन्ह नाही. देशात सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे.
डॉ. मोंगा म्हणाले की, शहरांच्या तुलनेत गावांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढत आहे. तिथे कोरोना साथीच्या फैलावावर नियंत्रण मिळविणे अवघड आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवले असले, तरी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांतील ग्रामीण भागात तसे यश मिळालेले नाही. त्या राज्यांनी तातडीने अधिक प्रभावी उपाय योजावेत. त्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी. यासाठी प्रतिबंधक लस प्रत्येकाला टोचणे हा एक चांगला उपाय आहे.
लसीच्या परिणामांचा अभ्यास आवश्यक
डॉ. मोंगा म्हणाले की, प्रायोगिक तत्त्वावर बनविलेल्या लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या लसीमुळे तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते का, याचाही अभ्यास करावा लागेल. या लसीमुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी निर्माण झालेली प्रतिकारशक्ती तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही, असे दिसून आले आहे.