धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:23 IST2025-10-16T11:22:55+5:302025-10-16T11:23:55+5:30
लखनौमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला.

धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला. मुलगा घरी मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत होता आणि अचानक बेडवर झोपला. बहिणीला वाटलं की, तिचा भाऊ झोपला आहे, पण तो बराच वेळ उठला नाही. हालचालही केली नाही, त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सडन गेमर डेथची ही घटना आहे. ज्यामध्ये मोबाईल किंवा संगणकावर गेम खेळताना गेमरचा मृत्यू होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक मोबाईलवर गेम खेळत होता. त्याची बहीण बाहेरून घरी परतली तेव्हा तिला विवेक बेडवर झोपलेला दिसला, त्याच्या मोबाईलवर गेम सुरू होता. तिला वाटलं की तो खेळताना झोपला असावा. पण त्याने अजिबात काही हालचाल केली नाही तेव्हा मात्र बहिणीला संशय आला आणि तिने मदतीसाठी हाक मारली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे मुलाला मृत घोषित करण्यात आलं.
'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे मोबाईल गेमर्सचा अचानक मृत्यू झाला. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अमेरिकन लायब्ररी जर्नलमधून याबाबतची मिळाली आहे. सडन गेमर डेथ म्हणजे गेम खेळता खेळता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं.
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NLM) वर एक रिसर्च अपलोड करण्यात आला आहे. पोर्टलमध्ये असं म्हटलं आहे की, जगभरात अनेक लोक मोबाईलवर गेम खेळताना मृत्युमुखी पडले आहेत. या घटनांमध्ये कोणताही हिंसाचार झालेला नाही आणि मृत्यू मोबाईल गेमशी संबंधित आहेत. त्याचा संबंध इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरशी देखील जोडण्यात आला आहे.
मोबाईलवर गेम खेळताना लोकांचा मृत्यू
रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, मोबाईलवर गेम खेळताना अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ही संख्या सुमारे २४ आहे. १९८२ मध्ये एकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर २००२ ते २०२१ पर्यंत २३ मृत्यू झाले होते, त्यापैकी बहुतेक पुरुष होते. या व्यक्तींचे वय ११ ते ४० वयोगटातील होतं. अर्ध्याहून अधिक रुग्ण आग्नेय आशियातील होते, ज्यामध्ये सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा समावेश होता. ही माहिती वर्तमानपत्रं आणि पोर्टलवरून गोळा करण्यात आली आहे.