युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:06 IST2025-11-24T22:06:00+5:302025-11-24T22:06:36+5:30
Lucknow Bomb Threat : लखनौतील लुलु मॉलमध्ये हे धमकीचे पत्र मिळाले आहे.

युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Lucknow Lulu Mall Threat Mail: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सोमवारी सायंकाळी एका धमकीच्या पत्रामुळे हादरली. शहरातील लुलु मॉलच्या बाथरुममध्ये एक पत्र सापडले, ज्यात 24 तासांत अनेक शाळा, सरकारी इमारती, चारबाग, विधानसभा, विमानतळ, रेल्वे स्टेशन यांसारख्या प्रमुख स्थळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पत्र मिळताच सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत.
दिल्लीतील अलीकडील स्फोटानंतर सुरक्षा आधीच कडक करण्यात आली असताना, या नव्या धमकीने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉडने माहिती मिळताच घटनास्थळ गाठले आणि शोधाशोध सुरू केली. मॉलसह शहरातील हजरतगंज, विधानसभा परिसर, लोक भवन, बापू भवन आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषतः गर्दी असलेल्या भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रमुख मार्गांवर वाहनांची तपासणी, ऐतिहासिक ठिकाणी सर्च ऑपरेशनदेखील चालवले जात आहे.
Lucknow, Uttar Pradesh: Police received a bomb threat targeting multiple locations in the city, including schools, buildings and other establishments. A four-line letter warned of explosions within 24 hours, without mentioning any specific names pic.twitter.com/oBSiIFguJJ
— IANS (@ians_india) November 24, 2025
पत्रात नाव नाही; फक्त चार ओळींत धमकी
धमकीच्या पत्रात कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे नाव नाही. चारच ओळींत, 24 तासांच्या आत शहरात स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस सध्या मॉलचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अपर पोलिस उपायुक्त (मध्य) जितेंद्र दुबे यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयित हालचाल आढळल्यास तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
श्रीराम मंदिर ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शहरात खळबळ
उद्या, म्हणजेच 25 नोव्हेंब रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी ही धमकी मिळाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने आतापर्यंतच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, तरीही सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, लखनऊमध्ये पुढील 24 तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.