Lockdown Yadav Born Amid Corona Crisis Welcomed By Akhilesh Yadav rkp | "नोटाबंदीवाले 'रोखपाल' आता एकटे नाहीत"; अखिलेश यादवांनी 'लॉकडाऊन यादव'ला दिल्या शुभेच्छा!

"नोटाबंदीवाले 'रोखपाल' आता एकटे नाहीत"; अखिलेश यादवांनी 'लॉकडाऊन यादव'ला दिल्या शुभेच्छा!

ठळक मुद्देकोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या या बाळाचे 'लॉकडाऊन यादव' या नावाने स्वागत करण्यात आले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही 'लॉकडाउन यादव'च्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लखनऊ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन दरम्यान उदयभान सिंह हे आपल्या गर्भवती पत्नीसह श्रमिक स्पेशल ट्रेनमधून महाराष्ट्र राजधानी मुंबईहून उत्तर प्रदेशात जात होते. यावेळी मध्य प्रदेशातील बुरहानपुरमध्ये ट्रेन पोहोचली असता उदयभानसिंह यांची पत्नी रीनाला त्रास होऊ लागला. यानंतर उदयभानसिंह यांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घेतली. 

रेल्वे कर्मचार्‍यांच्या मदतीने रीनाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात रीनाने एका मुलाला जन्म दिला. अशा कठिण परिस्थितीत नवजात बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचे नावही कायमचे आठवणीत राहील, असे द्यावे लागेल. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानंतर उदयभानसिंह आणि रीना यांनी आपल्या मुलाचे नाव 'लॉकडाउन' ठेवण्याचे ठरविले. 

कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या या बाळाचे 'लॉकडाऊन यादव' या नावाने स्वागत करण्यात आले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही 'लॉकडाउन यादव'च्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, यावरून केंद्रात आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.  ते म्हणाले, "कोरोनाबंदीच्या काळात ट्रेनमध्ये जन्मलेल्या 'लॉकडाउन यादव'च्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. आशा आहे की, नोटाबंदीच्या वेळी जन्म घेण्यास भाग पाडलेल्या 'रोखपाल'ला यापुढे एकटे वाटणार नाही."

याचबरोबर, आता या मुलांच्या जन्मासारख्या कठोर परिस्थितीपेक्षा त्यांचा आगामी प्रवास अधिक चांगला कसा होईल, हे भाजपा सरकारने सुनिश्चित करावे, असे म्हणत अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन दरम्यान मजुरांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown Yadav Born Amid Corona Crisis Welcomed By Akhilesh Yadav rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.