लडाखमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सची मुसंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 09:21 AM2023-10-09T09:21:41+5:302023-10-09T09:22:24+5:30

Ladakh Election Result: लडाख स्वायत्त पर्वतीय परिषद-कारगिलच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सने जोरदार मुसंडी मारली आहे. कलम ३७० हटवल्यानंतरची या भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती.

Ladakh Election Result: BJP's heavy defeat in elections in Ladakh, Congress-National Conference looms | लडाखमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सची मुसंडी 

लडाखमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सची मुसंडी 

googlenewsNext

लडाख स्वायत्त पर्वतीय परिषद-कारगिलच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सने जोरदार मुसंडी मारली आहे. कलम ३७० हटवल्यानंतरची या भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. या निकालांनंतर नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते ओमर अब्दुला यांनी या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला असून, ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचा दावा केला आहे. 

लडाख स्वायत्त पर्वतीय परिषद-कारगिलच्या निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सने मिळून आतापर्यंत २१ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत. एकूण २६ जागांपैकी २५ जागांचे निकाल हाती आले आहेत. ३० सदस्य संख्या असलेल्या लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद-कारगिलसाठी जम्मू-काश्मीर प्रशासन ४ सदस्यांची नियुक्ती करते. त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार असतो.

दरम्यान, या निकालांनंतर ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाला टोला लगावला आहे. या निकालांनी स्थानिक लोकांचं मत विचारात न घेता जम्मू काश्मीरच्या करण्यात आलेल्या विभाजनाविरोधात एक संदेश दिला आहे. हे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा आहेत. नॅशनल कॉन्फ्रन्स या निकालांमुळे आनंदित आहे.

तर या निकालांनंतर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली असून, हा निकाल म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा थेट परिणाम आहे, असं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, या निकालांकडे राष्ट्रीय प्रसारमाध्यमे दुर्लक्ष करतील. मात्र समोर येत असलेल्या कलांमधून काँग्रेस या ठिकाणी जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी  कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आल्यानंतर कारगिलमधील ही पहिली मुख्य निवडणूक होती. नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडीची घोषणा केली होती. तसेच क्रमश: १७ आणि २२ जागांवर उमेदवार उतरवले होते. तसेच ज्या ठिकाणी भाजपासोबत कडवी टक्कर आहे अशाच भागांसाठी ही व्यवस्था मर्यादित आहे, असंही या पक्षांनी स्पष्ट केलं होतं.  

Web Title: Ladakh Election Result: BJP's heavy defeat in elections in Ladakh, Congress-National Conference looms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.