कर्नाटककाँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असल्याचे बोलले जात असतानाच, राज्यातील सिद्धरामय्या सरकारने बुधवारी (२ जुलै २०२५) दोन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली आहे. यानुसार आता, बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून बंगळुरू उत्तर तर बागेपल्लीचे नाव बदलून भाग्यनगर करण्यात आले आहे.
कर्नाटककाँग्रेसमध्ये अंतर्गत कलह -तत्पूर्वी, कर्नाटक सरकारने, मे २०२५ मध्ये रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बंगळुरू दक्षिण असे केले आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, पक्षात कोणतीही गटबाजी नाही. आम्ही एकजूट आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
डीके शिवकुमार यांचा इशारा -नेतृत्व बदलाच्या विषयावर सार्वजनिक विधाने करणाऱ्या नेत्यांना नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा डीके शिवकुमार यांनी दिला आहे. यानंतर, मंगळवारी रामनगरचे आमदार एचए इक्बाल हुसेन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जे डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते.
"मी संपूर्ण पाच वर्षे कर्नाटकचा मुख्यमंत्री राहणार" -दरम्यान, आपण संपूर्ण पाच वर्षे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर राहणार. काँग्रेस एकजूट आहे आणि पक्षाचे सरकार पाच वर्षे मजबूत राहील, असे सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. "मी एकटा आहे का? लाखो पक्ष कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत" -याच बरोबर, शिवकुमार म्हणाले, "मी कुणालाही माझे नाव घेण्यास अथवा मला मुख्यमंत्री बनवण्यास सांगितलेले नाही. त्याची गरज नाही. सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री असताना नेतृत्वाच्या मुद्द्यावरून वादाचा प्रश्नच येत नाही. झ्यासारख्या शेकडो लोकांनी कठोर परिश्रम केले आहेत. मी एकटा आहे का? लाखो पक्ष कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. आपण प्रथम त्यांचा विचार करायला हवा," असे डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.