डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 20:38 IST2025-11-28T20:37:30+5:302025-11-28T20:38:02+5:30
Karnataka politics: शिवकुमार हे दिल्लीला जाणार होते, यासाठी त्यांनी आमदारांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. परंतू, अचानक त्यांनी दिल्ली भेट रद्द केली असून शनिवारी सकाळी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सुरू असलेल्या कथित 'पॉवर टसल'च्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. उद्या सकाळी दोघांमध्ये 'ब्रेकफास्ट मीटिंग' होणार आहे. शिवकुमार हे दिल्लीला जाणार होते, यासाठी त्यांनी आमदारांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. परंतू, अचानक त्यांनी दिल्ली भेट रद्द केली असून शनिवारी सकाळी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.
दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांनी शुक्रवारी आमदार नांजे गौडा आणि आमदार मंजुनाथ यांची भेट घेतली. या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, कर्नाटकातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेशी ही भेट जोडून पाहिली जात आहे. उद्या सकाळी सिद्धरामय्यांसोबत होणाऱ्या चर्चेपूर्वी ही भेट घेतल्याने या भेटीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उद्या (शनिवारी) सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्रींच्या अधिकृत निवासस्थानी 'कावेरी' येथे ब्रेकफास्ट मीटिंग करणार आहेत.
"हायकमांडने आम्हाला एकत्र बसून चर्चा करण्यास सांगितले आहे. हायकमांड आम्हाला जे काही करण्यास सांगेल, ते आम्ही करू.", असे शिवकुमार म्हणाले आहेत.
या बैठकीकडे कर्नाटक काँग्रेसमधील सत्ता वाटपाच्या वादळाला शांत करण्यासाठी 'हायकमांडचा अंतिम प्रयत्न' म्हणून पाहिले जात आहे. उद्याच्या बैठकीत दोन्ही नेते अडीच वर्षांच्या कथित सत्तावाटप करारावर तोडगा काढू शकतील का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.